करंजीत वरिष्ठांच्या छळाला कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्याची लसीकरण केंद्रात आत्महत्या - Medical officer commits suicide in hospital | Politics Marathi News - Sarkarnama

करंजीत वरिष्ठांच्या छळाला कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्याची लसीकरण केंद्रात आत्महत्या

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जुलै 2021

शेळके यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व महसूल प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी माझ्या आत्महत्येस कारणीभूत राहतील, असे म्हटले आहे.

पाथर्डी : वेळेत पगार न देणे, कामाचा अतिरिक्त भार व पगारकपातीच्या धमकीला कंटाळून करंजी (Karanji) प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश गोवर्धन शेळके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. (Medical officer commits suicide in hospital)

शेळके यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व महसूल प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी माझ्या आत्महत्येस कारणीभूत राहतील, असे म्हटले आहे.

करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय वैद्यकीय अधिकारी गणेश गोवर्धन शेळके एक वर्षापासून काम करतात. मंगळवारी दवाखान्यात लसीकरणाचे काम सुरू होते. शेळके व कोणाचा तरी भ्रमणध्वनीवरून वाद झाला. त्यानंतर आरोग्यसेविकेला ‘तुम्ही काम करा, मी दवाखान्यात थांबतो’ असे शेळके म्हणाले. खूप वेळ झाला तरी शेळके बाहेर आले नाहीत म्हणून तेथील नागरिक व सरकारी कर्मचाऱ्यांनी खिडकीतून आत पाहिले, तर शेळके यांचा मृतदेह दवाखान्याच्या खोलीतील पंख्याला लटकलेला दिसला. पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस अधिकारी घटनास्थळी गेले. तेथे पोलिसांना शेळके यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तसेच महसूल प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकारी आत्महत्येस जबाबदार राहतील. वेळेत पगार न देणे, कामाचा अतिरिक्त भार व पगारकपातीच्या धमकीमुळे आत्महत्या करीत असल्याबाबतचा मजकूर तीत आहे.

शेळके यांचा मृतदेह पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा शेळके यांच्या नातेवाइकांनी घेतला.

दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

दरम्यान, या प्रकारामुळे महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात चर्चा होत आहे.

 

दवाखान्यात केली आत्महत्या

डॉ. गणेश शेळके यांनी करंजी येथे दवाखान्यात आत्महत्या केली आहे. शवविच्छेदन नगर येथे करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- अरविंद जोधळे, पोलिस निरीक्षक, पाथर्डी

 

हेही वाचा..

संगमनेर नगरसेवकांची लसीकरण केंद्रावर मनमानी

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख