महापौर निवडणुकीत विधानसभेचे बिगुल, नगरवर वर्चस्व कोणाचे? - In the mayoral election, who is dominating the city? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

महापौर निवडणुकीत विधानसभेचे बिगुल, नगरवर वर्चस्व कोणाचे?

मुरलीधर कराळे
गुरुवार, 1 जुलै 2021

महापालिकेवर वर्चस्व ठेवून नगरसेवक हातात असले, की विधानसभेला त्याचा फायदा होतो. काल झालेल्या महापौर निवडीतूनही तसाच संदेश मिळाला आहे.

नगर : शहराचीच नव्हे, तर जिल्ह्याची नाडी समजल्या जाणाऱ्या महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व भाजपमध्ये कायम रस्सीखेच असते. कारण विधानसभेच्या लढतीचे चित्र त्यात दडलेले असते.

महापालिकेवर वर्चस्व ठेवून नगरसेवक हातात असले, की विधानसभेला त्याचा फायदा होतो. काल झालेल्या महापौर निवडीतूनही तसाच संदेश मिळाला आहे. शिवसेनेचा महापौर झाला असला, तरी बरेचसे नगरसेवक राष्ट्रवादीच्या छायेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा वरचष्मा याही वेळी पाहण्यास मिळाला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप व जगताप कुटुंबाची गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरावर पकड कायम आहे. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये जगताप यांनी विधानसभेचे सदस्यत्त्व आपल्याकडे खेचून आणले. त्यापूर्वी तब्बल पाच निवडणुकांत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी आमदारकी शिवसेनेकडे शाबुत ठेवली होती. गेल्या दोन निवडणुकांत मात्र त्यांना यश आले नाही. आमदार जगताप यांनी त्यांची ती परंपरा खंडीत केली होती. नगर शहरात गेल्या काही वर्षांपासून राठोड व जगताप कुटुंबियांत विधानसभेची लढाई पाहण्यास मिळत होती. पुढील निवडणुकीत मात्र राठोड नसल्याने जगताप यांना प्रतिस्पर्धी कोण असेल, याबाबत शिवसेनेतच अंतर्गत तंटे होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला शहराची सत्ता मिळाली असली, तरी पक्षातील दोन-तीन गट एकमेकांना शांत बसू देणार नाहीत. महापौर निवडीच्या पूर्वसंध्येलाच याची चुनूक दिसून आली. एका हाॅटेलवर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत मारामारी झाली. सत्ता येण्याच्या आधीच हे गट एकत्र येत नसतील, तर सत्तेनंतर कसे काय काम करणार, हा यक्ष प्रश्न आहे. तथापि, राष्ट्रवादीचा उपमहापौर असल्याने आमदार जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली उपमहापौर गणेश भोसले हे कामकाज पाहणार आहेत. अर्थात महत्त्वाची कामे भोसले यांच्याच हातून होणार आहेत, हे निश्चित आहे. 

एकूणच महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असली, तरीही राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहणार आहे. गेल्या अडीच वर्षातही भाजपची सत्ता होती, परंतु वर्चस्व राष्ट्रवादीच्या आमदारांचेच होते. भविष्यातही तेच होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील दुही अशीच धुमसत राहिल्यास त्याचा फायदा राष्ट्रवादीलाच होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप सर्व ताकतीनिशी लढेल, यात शंका नाही. परंतु या पक्षाकडे सध्यातरी भक्कम उमेदवार नाही. त्यामुळे हा पक्ष नेमका कोणाची फोडाफोडी करणार, की कोणी आयात करणार, याबाबत राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

 

हेही वाचा..

आधी दारू पाजली, नंतर हाणमार केली, शिवसेनेतील राडा

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख