महापौर निवडणूक : महसूलमंत्री थोरातांच्या जिल्ह्यात काॅंग्रेसच बेदखल?

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच काॅंग्रेस बेदखल झाल्याने आघाडी नेमका कोणाची झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nagar Mahapalika1.jpg
Nagar Mahapalika1.jpg

नगर : महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेला महापौरपद तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद देण्याचे ठरले आहे. मात्र या सर्व घडामोडीतून काॅंग्रेसला (Conress) बाजूला ठेवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज शिवसेनेबरोबरच काॅंग्रेसनेेही उमेदवारी अर्ज नेला आहे. (Mayoral election: Congress evicted in Revenue Minister Thorat's district?)

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच काॅंग्रेस बेदखल झाल्याने आघाडी नेमका कोणाची झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेत आजपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे मात्र कोणीही उपस्थित नव्हते. शिवाय, काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यासाठी महापौर व उपमहापौरपदाचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज नेण्यात आले. त्यामुळे शेंडगे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत की नगरमधील नवीन विकास आघाडीच्या, याबाबत महापालिकेत चर्चा रंगली होती.

नगर महापालिकेतील महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, तर उपमहापौरपद खुले आहे. महापालिकेत आज दुपारी शिवसेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले आदी उपस्थित होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर, तर दुसरा गट अलिप्तपणे दुसऱ्या बाजूला बसल्याचे चित्र होते.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहरात घडलेल्या दोन घटनांमुळे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे नेते यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. मनातील त्या जखमा अजून भरलेल्या नसल्याचे, शिवसेनेचा मोठा गट व राष्ट्रवादीचे नेते यांच्या वर्तणुकीवरून दिसत होते. त्यातच काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यासाठी महापौर व उपमहापौरपदासाठीचे अर्ज नेल्याने महाविकास आघाडीचे गणित अजून तरी नगर शहरात जुळले नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या (मंगळवारी) उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल होईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठीचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याची चर्चा महापालिकेत होती. उपमहापौरपदासाठी गणेश भोसले व विनित पाऊलबुधे यांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या शीला चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज नेला आहे.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com