ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा : थोरातांच्या प्रशासनाला सूचना - Make effective use of the triad of tracing, testing and treatment: Instructions to the administration of Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करा : थोरातांच्या प्रशासनाला सूचना

आनंद गायकवाड
शनिवार, 10 एप्रिल 2021

यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकिय कार्यालयात आयोजित केलेल्या कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते.

संगमनेर : कोरोनाच्या जागतीक महामारीचा सामना करण्यासाठी व या संकटातून आपल्यासह कुटूंबियांना वाचवण्यासाठी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व देत, मास्कचा वापर व शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकिय कार्यालयात आयोजित केलेल्या कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढणारी रुग्णसंख्य़ा चिंतेची बाब आहे. या संकटातून स्वतःसह कुटूंबाला वाचविण्यासाठी विनाकारण बाहेर फिरणे टाळा, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व योग्य शारिरीक अंतराच्या त्रीसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे.

नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी. कोरोना दक्षता समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत कराव्यात तसेच एका रुग्णापाठोपाठ वीस जणांची तपासणी करतांना ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करा. लसीकरणाचा वेग वाढवा. तसेच रुग्णांना त्वरीत चांगली सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने सजगतेने काम करण्याच्या सूचना थोरात यांनी दिल्या. यावेळी त्यांनी संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. तसेच उपलब्ध बेडची संख्या, अत्यावश्यक व्हेंटिलेटरची गरज, लसीकरणाची व्यवस्था कोविड केअर सेंटर बाबत करावयाच्या उपाययोजना आदींचा आढावा घेतला.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया, डॉ. राजकुमार जर्‍हाड, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सार्वजनिक बांधकामचे आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. 
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख