महापाैर निवडणूक ! शिवसेनेतील अवमेळाचा फायदा राष्ट्रवादीला शक्य - Mahapair election! NCP can benefit from Shiv Sena's infighting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

महापाैर निवडणूक ! शिवसेनेतील अवमेळाचा फायदा राष्ट्रवादीला शक्य

मुरलीधर कराळे
शनिवार, 5 जून 2021

शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असतानाही मागील वेळी महापौरपदाने पक्षाला हुलकावणी दिली.

नगर : शहरावर एकहाती अंमल राहण्यासाठी महापौरपद आपल्याकडे असावे, हे प्रत्येक पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पद ताब्यात असणे आवश्यक असते. याच मुद्द्याचे पडसाद महापौर निवडणुकीच्या बाबतीत पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील (Shivsena) दोन गटांतील अवमेळामुळे हे पद राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्यता आहे. (Mahapair election! NCP can benefit from Shiv Sena's infighting)

शिवसेनेकडे जास्त नगरसेवक असतानाही मागील वेळी महापौरपदाने पक्षाला हुलकावणी दिली. शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला मदत केल्याने भाजपचा महापौर झाला. शिवसेनेला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. आता परिस्थिती बदलली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हे पद मिळविणे शक्य आहे; मात्र परिस्थिती तशी नाही. शिवसेनेत दोन गट आहेत. दोन्ही गटांकडे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा आहे. दोन्ही गटांच्या वितंडामुळे, आपल्याला नाही तर दुसऱ्यालाही नको, अशीच वेळ येऊ शकते. त्यातूनच राष्ट्रवादीला फायदा होईल, अशी चिन्हे आहेत.

महापालिकेत सध्या शिवसेनेकडे २३, राष्ट्रवादीकडे १८, भाजपकडे १५, कॉँग्रेस ५, बसप ४, समाजवादी पक्ष १ व अपक्ष १ असे बलाबल आहे. एकूण 67 नगरसेवक आहेत. महापौर निवडीसाठी ३४ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. शिवसेनेने ठरविले तर कॉँग्रेस, बसप, समाजवादी पक्ष व अपक्ष यांची मोट बांधून किंवा भाजपचे काही नगरसेवक फोडून महापौरपद मिळविणे शक्य आहे. मात्र तसे होणार नाही. महाविकास आघाडीतील कॉँग्रेसचे प्रमुख नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आहेत. ते ही फोडाफोडी होऊ देणार नाहीत. तसेच शिवसेनेकडेही इतरांना फोडण्याइतकी ताकद नाही, असेच चित्र आहे. त्यामुळे ही शक्यता धूसर आहे. 

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपला यापूर्वी मदत केली आहे. सध्या भाजपची भूमिका गुलदस्त्यात असली, तरी ऐन वेळी ते मदत करू शकतात. शिवाय, कॉँग्रेसचे पाचपैकी काही नगरसेवक आमदार जगताप यांना मानणारे आहेत. सध्या आमदार संग्राम जगताप यांचेच शहरावर वर्चस्व असल्याने, इतर नगरसेवकही त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

आगामी विधानसभेचे गणित जुळविताना आमदार जगताप हे पद इतरांना जाऊ देणार नाहीत. महापालिकेची सत्ता आपल्याच हातात ठेवण्यासाठी ते आवश्यक ते प्रयत्न करतील, यात शंका नाही. त्यामुळे कितीही घडामोडी घडल्या, तरी महापौर राष्ट्रवादीचा होईल, अशीच शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे एकमेव रूपाली पारगे या उमेदवार आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल, अशी सध्या तरी परिस्थिती आहे.

संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादी - रूपाली जोसेफ पारगे
शिवसेना - रोहिणी संजय शेंडगे, रिता शैलेश भाकरे, शांताबाई दामोदर शिंदे
कॉँग्रेस - शीला दीप चव्हाण
भाजप - उमेदवार नाही
 

 

हेही वाचा..

नगरच्या महापाैरपदाचे बिगुल वाजले

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख