नगर शहरातील लॉकडाउन शिथिल, महापालिका आयुक्‍तांना निर्णय  - Lockdown in the city relaxed, decision to the Municipal Commissioner | Politics Marathi News - Sarkarnama

नगर शहरातील लॉकडाउन शिथिल, महापालिका आयुक्‍तांना निर्णय 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

महापालिका आयुक्‍त गोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मार्केट यार्ड परिसर व शहराची पाहणी करून 3 मे पासून शहरात कडक लॉकडाउन जाहीर केला होता.

नगर : नगर शहरातील कोरोना (Corona) रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. त्यासंदर्भातील काल दुपारी त्यांनी आदेश काढला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना दिला मिळाला आहे. मात्र त्याच वेळी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्‍त केली जात आहे.  (Lockdown in the city relaxed, decision to the Municipal Commissioner)

महापालिका आयुक्‍त गोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मार्केट यार्ड परिसर व शहराची पाहणी करून 3 मे पासून शहरात कडक लॉकडाउन जाहीर केला होता. या कडक लॉकडाउनला 15 मेपर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र मागील आठवड्याभरातील कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या पाहता, तसेच शेतकरी संघटना व व्यापाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता आयुक्‍त गोरे यांनी लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय आज घेतला. त्यानुसार उद्यापासून (शनिवार) शहरात लॉकडाउन शिथिल झाला आहे. त्यामुळे शहरात जीवनावश्‍यक सेवा सुरू राहतील. मात्र त्यांनाही ठराविक वेळ देण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याचे बंधनही घालून दिले आहे. 

वेळ न पाळल्यास होईल कारवाई 

कृषी दुकानांना सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विक्रीस परवानगी दिली आहे. हे साहित्य वाहतुकीसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 हा वेळ देण्यात आला आहे. नियम तोडल्यास पाच हजारांचा दंड, दुसऱ्यांदा पाच हजारांचा दंड व दुकान सील करण्यात येणार आहे. किराणा दुकानांना व भाजीपाला विक्रीस सकाळी 7 ते 11 ही वेळ देण्यात आली आहे. अंडी, मटन, चिकन व मासे विक्रीला सकाळी 7 ते 11 ही वेळ दिली आहे, असे महापालिका आयुक्‍तांच्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा...

कोरोना कमी होतोय 

अक्षयतृतीयेसाठी दिली सूट 

महापालिकेच्या दक्षता पथकाने आज भाजीपाला व दुकानांवर कारवाई केली. मात्र अक्षय तृतीयेचा कार्यक्रम पाहता पथकाने कऱ्हा-केळी, फुले, अंबे विक्री करणाऱ्यांवर दुपारीपर्यंत कारवाई केली नाही. त्यानंतर मात्र कारवाई सुरू करण्यात आली. 

हे चालू राहणार 

* वैद्यकीय सेवा, औषध दुकाने 
* अत्यावश्‍यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील 
* घरपोच गॅस वितरण सेवा 
* सर्व बॅंका 
* दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, पशुखाद्य विक्री 
* कृषिकेंद्र 
* किराणा दुकाने 
* भाजीपाला व फळे 
* अंडी, मटन, चिकन व मासे 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख