"कुकडी' बिनविरोधच्या हालचाली, राहुल जगताप निर्धास्त - "Kukdi 'unopposed movement, Rahul Jagtap indifferent | Politics Marathi News - Sarkarnama

"कुकडी' बिनविरोधच्या हालचाली, राहुल जगताप निर्धास्त

संजय आ. काटे
बुधवार, 31 मार्च 2021

जगताप यांची कारखान्यावर एकहाती सत्ता आहे. कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर संचालक मंडळात काही मतभेद झाल्याची चर्चा असली, तरी ते कोणी जाहीरपणे व्यक्त केले नसल्याने जगताप यांचे वर्चस्व अबाधित असल्याचे चित्र आहे.

श्रीगोंदे : कर्मवीर कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. ती बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते घनश्‍याम शेलार यांनी जुळवून घेतल्याने कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप निर्धास्त झाले आहेत. तथापि, जिल्हा बॅंक निवडणुकीत डिवचले गेलेले बॅंकेचे माजी संचालक दत्तात्रेय पानसरे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. 

जगताप यांची कारखान्यावर एकहाती सत्ता आहे. कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर संचालक मंडळात काही मतभेद झाल्याची चर्चा असली, तरी ते कोणी जाहीरपणे व्यक्त केले नसल्याने जगताप यांचे वर्चस्व अबाधित असल्याचे चित्र आहे. गेल्या वेळी शेलार यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत जगताप यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली. त्यावेळी रान उठवूनही त्यांच्या गटाचा धुव्वा उडाला होता. 
मागील पाच वर्षांत कारखान्यातील समीकरणे बदलली आहेत. कुंडलिकराव जगताप यांच्या अनुपस्थितीतील ही पहिलीच निवडणूक.

शेलार यांना साखर संघावर पाठविण्यासाठी माजी आमदार जगताप यांनी कारखान्याचा दिलेला ठराव त्यांच्यासाठी जमेची बाजू राहील. खुद्द शेलार यांनीच कारखाना बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केल्याने, त्यांची भूमिका लक्षात येते. 

दरम्यान, निवडणुकीत बॅंकेचे माजी संचालक पानसरे व जगताप यांचे कट्टर विरोधक पंधरकर काय भूमिका घेतात, यावर निवडणूक होणार की नाही हे ठरणार आहे. पानसरे यांना जिल्हा बॅंकेसाठी जगताप अडसर ठरले होते. त्याची सल त्यांच्या मनात आहे. पंधरकर यांना विचारले असता, थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. 

कारखानदारी अडचणीत

"तात्यां'नी हा कारखाना सामान्य शेतकऱ्यांसाठी उभा केला. सध्या कारखानदारी अडचणीतून जात असल्याने निवडणूक बिनविरोध करावी व त्यासाठी विरोधकांनी मोठेपणा दाखवावा, असे आवाहन कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप यांनी केले.

अजून चर्चा नाही

कुकडी कारखाना निवडणुकीबाबत अजून कोणाशी चर्चा नाही. मात्र, चाचपणी सुरू आहे. सहकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, असे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे यांनी सांगितले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख