`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न

शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे. नुकतेच संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला.
`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न
Bhau korgaonkar.jpg

नगर : शिवसनेचा महापाौर झाल्यानंतर नगरमध्ये या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कात टाकली आहे. शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे. नुकतेच संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला.

नगर येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, विजय पठारे, अमोल येवले, संग्राम शेळके, संग्राम कोतकर, बबलू शिंदे आदी उपस्थित होते.

या वेळी कोरगावकर यांनी विविध विषयांवर चर्चा करीत नगर शहरात शिवसेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की शिवसेनेेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी संघर्षमय भुमिका घेतलेली आहे. तळागाळातील लोकांचे प्रश्‍न सोडविले जावे, त्यांना न्याय मिळवा, यासाठी शिवसैनिक प्रयत्नशिल असतात. नागरिकांचे प्रश्‍न सुटत असल्याने तेही शिवसेनेशी जोडले जात आहेत. शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यात शिवसैनिकांचे मोठे परिश्रम आहेत. आज राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, नगरमध्येही आता शिवसेनेच्या महापौर आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देऊन जनतेची सेवा करावी. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. त्याचबरोबर संघटनही वाढवावे. जुन्या-नव्यांचे मेळ घालून नगर जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क अभियान राबविण्यात आले, त्यास उत्फुर्त प्रतिसाद लाभला. यापुढील काळात राज्यातील मंत्र्यांना नगरमध्ये आणून जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न राहील. पक्ष संघटनेचे काम वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुनही ताकद दिली जाईल, असे कोरगावकर यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, की शिवसंपर्क अभियानाचा समारोप होत असला, तरी शिवसैनिकांनी कायम नागरिक व पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी संपर्कात राहिले पाहिजे. नगर शहर हे सेनेचा बालेकिल्ला असल्याने हे मजबूत संघटन आणखी मजबूत करावे.

शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, की नगर शहरात शिवसेनेने आपल्या कामाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. नागरिकांचे प्रश्‍नांसाठी आपण सदैव तत्पर राहिले पाहिजे. हीच शिकवण स्व. अनिल राठोड यांनी दिली आहे. आज महापौरपद शिवसेनेकडे असल्याने त्या माध्यमातून आपआपल्या भागातील प्रश्‍न सोडवावे, त्याच बरोबरच संघटना वाढीसाठीही प्रयत्न करावेत. नगर शहरात  पुढील काळात शिवसेनेच्या 70 ते 80 शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला. कोरोनामुळे विस्कटलेली घडी व्यवस्थीत बसविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन करुन संघटनेचा आढावा सादर केला.

या वेळी विक्रम राठोड म्हणाले, की युवक - विद्यार्थ्यांचे प्रश्‍न आक्रमकपणे सोडविल्याने युवकांमध्ये शिवसेनेबद्दल मोठे आकर्षक आहे. या युवकांना योग्य दिशा देण्याचे काम युवा सेनेचे पदाधिकारी करत आहेत. शिक्षण व नोकरी आदिंसह विविध उपक्रमातून शिवसेनेचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in