गावाकडील खिलारचा अमोल कोल्हेंमुळे संसदेत महिमा

‘पेटा’ कायदा लागू झाल्याने, सात वर्षांपासून बैलांच्या शर्यतींवर बंदी आली तशी गावोगावच्या जत्रांची शान गेली.
Amol kolhe.jpg
Amol kolhe.jpg

शिर्डी ः ‘वादीपायी म्हैस मारणे’ किंवा ‘नाल सापडली म्हणून घोडा विकत घेणे’ या दोन्ही ग्रामीण म्हणी, ‘हौसेला मोल नसते’ हा वाक्‌प्रचार सार्थ ठरवत आहेत. राज्यात आज थोडेथिडके नव्हे, तब्बल ६५ हजार गाडामालक व त्यांचे दीड लाखाहून अधिक, वायुवेगाने धावणारे सळसळते खिलार बैल, हे ‘हौसेला मोल नसते’ हा वाक्‌प्रचार सार्थ ठरवीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी हे हौशी गाडामालक आपल्या जिवलग खिलार जोड्यांसह बैलशर्यतींवरील बंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले, तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट लोकसभेत खिलारचा महिमा कथन केला. ‘पेटा’ कायदा लागू झाल्याने, सात वर्षांपासून बैलांच्या शर्यतींवर बंदी आली तशी गावोगावच्या जत्रांची शान गेली. नगर जिल्ह्यातील काही भागात या शर्यतींना ‘ठणके’ असे संबोधले जाते. शर्यतीसाठीच्या जातिवंत एका खिलार जोडीची किंमत पाच ते दहा लाखांपर्यंत. देखभालीचा खर्च अचंबित करणारा.

हेही वाचा...


साकुरीचे माजी सरपंच दीपक (आबा) रोहोम हे खिलारचे शौकीन. ते म्हणाले, की खिलार जोडीला रोज अडीच किलो गहू आणि उडदाचा भरडा, दोन अंडी, मोहरीचे तेल आणि कोरडी व हिरवी वैरण द्यावी लागते. अणकुचीदार शिंगांची, नाकात वारे भरलेली आणि नागासारखी सळसळती जोडी खुंट्यावरून सोडून टांग्याला जुंपणे आणि त्यांचा सराव घेणे तोंडाचे काम नाही. संगोपन करणारे, टांग्याला जुंपणारे, त्यांची वाहतूक करणारे आणि प्रत्यक्षात शर्यतीत टांग्यावर मांड ठोकून, त्यांना जिवाची जोखीम पत्करून पळविणारे (जॅकी) वेगवेगळे हौशी लोक असतात. मालकासह यातील कुणीही बक्षिसाच्या आशेने खिलारकडे पाहत नाही. हा एक मर्दानी खेळ आहे. तो खेळण्याची हौस भागविण्यासाठी गेल्या चारशे वर्षांपासून या शर्यती भरविल्या जातात. यात हौसेला मोल नसते. आता कायद्याच्या अडचणीमुळे त्यावर बंदी आली.

हेही वाचा...

खिलार ही वायुवेगाने धावण्याची क्षमता असलेल्या बैलांची जात. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी तिचे पालन व जतन केले आहे. पाळीव असल्याने ‘पेटा’ कायदा त्याला लागू होत नाही. शर्यत आणि खिलार यांचे नाते जिवाभावाचे आहे. शर्यत नाही तर जत्रेत गंमतच नाही, अशी या हौशी गाडामालकांची भूमिका आहे.

पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात खिलारचे संगोपन केले जाते. खिलार महाराष्ट्राची शान आहे. दहा टक्के खिलारांत अतिवेगाने पळण्याची क्षमता असते. ती सिद्ध झाली की त्यांची किंमत चार ते पाच लाखांपर्यंत मोजायला हौशी मंडळी तयार असतात. यात लाखो लोकांना रोजगार मिळतो. बंदी येण्यापूर्वीच शर्यतीत चाबूक किंवा आरीचा वापर टाळण्यास सुरवात झाली होती. या मर्दानी खेळाला चारशे वर्षांची परंपरा आहे. हा सगळा हौशीचा मामला आहे.
- दीपक रोहोम, माजी सरपंच, साकुरी

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in