होम क्वारंटाईनऐवजी रुग्णाला कोविड सेंटरमध्ये ठेवा : बाळासाहेब थोरात - Keep the patient in Kovid Center instead of Home Quarantine: Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

होम क्वारंटाईनऐवजी रुग्णाला कोविड सेंटरमध्ये ठेवा : बाळासाहेब थोरात

संजय आ. काटे
शनिवार, 17 एप्रिल 2021

नागवडे कारखान्याने श्रीगोंद्यात कोरोना केअर सेंटर सुरू केले, ही चांगली बाब आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी "होम क्वारंटाईन' होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत.

श्रीगोंदे : "कोरोना संकटात आता सगळ्यांना सावधता बाळगावीच लागेल. आपला जीव वाचविण्यासाठी "लॉकडाउन' हाच एकमेव उपाय आहे. एक मेपर्यंत कडक "लॉकडाउन' केले, तरच कोरोना आटोक्‍यात येऊ शकेल. श्रीगोंद्यात "होम क्वारंटाईन'चे काम बंद करून कोरोनाबाधित रुग्णाला थेट कोविड सेंटरमध्ये ठेवा,'' अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. 

 

थोरात यांनी आज (शनिवारी) श्रीगोंद्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार सुधीर तांबे, राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, अनुराधा नागवडे, दीपक नागवडे, शुभांगी पोटे, घनश्‍याम शेलार, दीपक भोसले, बाबासाहेब भोस, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार आदी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, ""नागवडे कारखान्याने श्रीगोंद्यात कोरोना केअर सेंटर सुरू केले, ही चांगली बाब आहे. कोरोनाबाधित रुग्णांनी "होम क्वारंटाईन' होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनसह अन्य औषधे व लस उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे.'' 

पाचपुते म्हणाले, ""कोरोनाबाबत शासनाने सतर्क राहण्याची गरज होती. उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्‍यक होते. तहसीलदार, डॉ. नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम चांगले काम करीत आहे. आमदार निधीतून दोन रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. परिक्रमा शिक्षण संस्थेतही कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी आहे.'' 

नागवडे म्हणाले, ""कोरोनाचा मुकाबला करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्ञानदीप व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयांत कोविड हेल्थ सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे.'' सुधाकर भोसले यांनी प्रास्ताविक केले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख