हात जोडून विनंती, नागरिकांनी काळजी घ्यावी ः हसन मुश्रीफ - Joining hands, citizens should be careful: Hasan Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

हात जोडून विनंती, नागरिकांनी काळजी घ्यावी ः हसन मुश्रीफ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

देशातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. जोपर्यंत ही साखळी तुटणार नाही, तोपर्यंत हा कोरोना आटोक्यात येणार नाही.

नगर : रेमडेसिव्हिर इंजेक्शनसह ऑक्सिजनचा तुडवडा असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांना हात जोडून विनंती, कृपया काळजी घ्या, अशी विनंती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर जिल्हावासियांना केली.

मुश्रीफ आज नगर जिल्हा दाैऱ्यावर आहेत. शिर्डी येथे आढावा बैठकित बोलताना त्यांनी कोरोनाविषयीच्या उपाययोजनांविषयी भाष्य केले.

ते म्हणाले, की देशातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. जोपर्यंत ही साखळी तुटणार नाही, तोपर्यंत हा कोरोना आटोक्यात येणार नाही. लॉकडाऊन करण्याची वेळ आली, त्या वेळी अनेक नागरिक रस्त्यावर आले. त्यामुळे आम्ही जीवनावश्यक वस्तुंसाठी सवलत दिली, मात्र त्याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याचे दिसून येत आहे. 

कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केले आहे. लोकांनी नियमांचे पालन केले नाही, तर संचारबंदी केल्याशिवाय पर्याय नाही. रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात बेड देखील अपुरे पडत आहेत. आताची परिस्थिती गंभीर असून, एकजण जवळपास सहाशे लोकांना बाधित करत आहे. रेमडेसिव्हिरसह ऑक्सजनचा तुडवडा असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

शिर्डी रुग्णालयमध्ये 100 बेड नॉन कोविडसाठी राहणार आहे. 150 बेड कोविडसाठी ठेवणार असल्याने इतर आजारांवर तिथे उपचार केले जातील, असे मुश्रीफ म्हणाले.

 

हेही वाचा...

जेऊरमध्ये तिसऱ्यांदा शटर डाउन 

नगर : जेऊर (ता. नगर) गावात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा गावात सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. सात दिवस गावात "जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. 

जेऊरसह परिसरातील वाघवाडी, बहीरवाडी, चाफेवाडीसह बारा वाड्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरातील सुमारे 72 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजअखेरपर्यंत जेऊरसह परिसरात सुमारे दोनशे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांतील सात जणांचा मृत्यू झाला आहे. 
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जेऊरमध्ये यापूर्वी दोनदा तीन दिवसांचा "जनता कर्फ्यू' पाळण्यात आला होता; मात्र रुग्णसंख्या वाढतच असल्याने आता सात दिवसांचा "जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे. 

कोरोना ग्रामस्तरीय समितीने आजपासून (शनिवार) सात दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 17 ते 23 एप्रिलदरम्यान गाव बंद राहणार आहे. किराणा दुकाने व दूध डेअरी सकाळी सहा ते आठ या वेळातच उघडी राहतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख