जयंत पाटलांनी दिल्या नगरकरांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा - Jayant Patil wished the city dwellers a happy foundation day | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांनी दिल्या नगरकरांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 28 मे 2021

श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे उत्खननातुन सिंधू संस्कृतीचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

नगर : आज नगरचा ५३१ वा स्थापना दिवस. बहामनी राजवट संपुष्टात आल्यानंतर १४९० साली अहमद निझामशाहा (Ahmed Nijamshaha) याने 'कोटबाग निजाम' हा राजवाडा बांधून या शहराची स्थापना केली. नगरला अत्यंत वैभवशाली असा इतिहास लाभला आहे. या नगरवासियांना मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Jayant Patil wished the city dwellers a happy foundation day)

ते म्हणाले, की श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे उत्खननातुन सिंधू संस्कृतीचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे. ज्ञानेश्वरीची रचना याच जिल्ह्यातील नेवासे येथे संत ज्ञानेश्वरांनी केली. 

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातही नगरचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना ब्रिटिश सरकारने अटक करून प्रदीर्घ काळ इथेच ठेवले होते. याच ठिकाणी पंडितजींनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्योत्तर काळातही या जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि देशाला नेतृत्व दिले. सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ याच जिल्ह्यात पद्मश्री विखे पाटील यांनी रोवली. पुढे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, दादासाहेब तनपुरे, मारुतराव घुले पाटील यांनी त्यावर कळस चढवला.

मधू दंडवते यांच्यासारखे संपूर्ण देशात आदराला पात्र झालेले नेतेही मूळचे याच जिल्ह्याचे. क्रीडापटू झहीर खान, अजिंक्य रहाणे, अभिनेते सदाशिव अमरापूरकर, शाहू मोडक, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासारखे व्यक्तिमत्वेही याच जिल्ह्यातील आहेत.

शिर्डीचे साईबाबा देवस्थान, शनी महाराजांचे शनी शिंगणापूर याच जिल्ह्यात. जैन मुनी आनंद ऋषी याच जिल्ह्यातील. एकंदरच हा जिल्हा कर्तृत्ववान व प्रतिभासंपन्न व्यक्तींचा जिल्हा आहे. 

माझे स्वतःचे नगरसोबत कौटुंबिक नाते आहे. माझ्या दोन सख्या बहिणी आणि त्यांचे कुटुंब याच जिल्ह्यात असतात. काही काळ नगरचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडण्याचे भाग्य मला लाभले आहे. 

सर्व नगरवासियांना स्थापना दिनाच्या मनापासून शुभेच्छा! या जिल्ह्यातील तरुण तरुणींनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत उज्वल असे नाव कमवावे व नगरच्या ह्या संपन्न वारश्याची पताका अजून उंच फडकावी हीच इच्छा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...

नगरचा आज स्थापना दिन

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख