नगरमध्ये जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या बैठकित निर्णय - Janata Curfew in the town, meeting decision of Guardian Minister Mushrif | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

नगरमध्ये जनता कर्फ्यू, पालकमंत्री मुश्रीफ यांच्या बैठकित निर्णय

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता आहे. रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्‍शन मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटली तरच जीव वाचणार आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रोज नवा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा दाैऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित कठोर निर्णय झाले. त्यानुसार येत्या 14 दिवस जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी या वेळी उपस्थित होते. जनता कर्फ्यूचे नियम लवकरच जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. 

श्रीफ म्हणाले, ""रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता आहे. रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्‍शन मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोरोना संसर्गाची साखळी तुटली तरच जीव वाचणार आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही.''

कोरोनाबाधित रुग्णांना घरी विलगीकरण कक्षात राहण्यास परवानगी होती. त्यामुळे कुटुंबे बाधित होऊ लागली आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर (सीसीसी) राहणे सक्‍तीचे केले जाणार आहे. 

थोरात म्हणाले, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झाल्यावर सात दिवसांनी लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे कोरोनाबाधितांकडून इतरांना वेगाने संसर्ग होत आहे. कडक "जनता कर्फ्यू'चे पालन केल्यानंतर 14 दिवसांनी रुग्णसंख्या कमी होईल. त्यासाठी प्रत्येकाने "कर्फ्यू'ला साथ देण्याची गरज आहे. 

दरम्यान, पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा प्रशासनावर वचक होता. ते स्वतः रुग्णालयाला भेटी देऊन आढावा घेत होते. सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. "जिल्हाधिकारी आदेश हवेत देतात, की जमिनीवर देतात; पण अंमलबजावणी काहीच होत नाही,' असे त्यांनी म्हटले होते. त्याचा आधार घेत पत्रकारांनी थेट पालकमंत्र्यांना, "कोरोना नियंत्रण कक्षातून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत,' असे सांगताच त्यावर, त्यांनी यापुढे सर्व अधिकाऱ्यांनी दूरध्वनी 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. 

 

हेही वाचा...

शेवगावमध्ये कोरोनाने चौघांचा मृत्यू 

शेवगाव : शहरात कोरोनामुळे बाधित असलेल्या आणि विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या चार जणांचे आज निधन झाले. त्यांच्यावर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील सोनमियॉं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 

शेवगाव तालुक्‍यात कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालय, डॉ. आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. अनेक जण शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तालुक्‍यात बाधितांबरोबरच मृतांची संख्याही वाढत चालली आहे. शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या चार कोरोना बाधितांचे आज निधन झाल्याने त्यांच्यावर नगरपरिषदेचे आरोग्य विभागप्रमुख भारत चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. 

दरम्यान, महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, बहुतेक ठिकाणी जनता कर्फ्यूची गरज आहे.

Edited By -Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख