कोविड लक्षणे असणार्‍या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करा : थोरात यांच्या सूचना - Immediately isolate people with covid symptoms: Thorat's instructions | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड लक्षणे असणार्‍या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करा : थोरात यांच्या सूचना

आनंद गायकवाड
शुक्रवार, 7 मे 2021

कोरोना संकट थोपवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अत्यंत कार्यक्षमपणे काम करीत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

संगमनेर : कोरोनाची (Covid-19) साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे कठोर पालन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रशासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णाचे तातडीने विलगीकरण करण्याच्या सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रशासनाला दिल्या. (Immediately isolate people with covid symptoms: Thorat's instructions)

अमृतवाहिनी अभियांत्रीकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, कोरोना संकट थोपवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अत्यंत कार्यक्षमपणे काम करीत आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यात घरोघर तपासणी केली जात आहे. आजारांचे कोणतीही लक्षणे असलेल्या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण करावे, कोणीही निष्काळजीपणा करू नका.

ऑक्सिजन व मूलभूत औषधे पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न केले आहेत. ग्राम सुरक्षा दलाने अधिक सक्षम होण्याची आता गरज आहे. रुग्ण शोध मोहीम अधिक प्रभावी करणे, लसीकरणासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन कोरोनामुक्त गावाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणारी नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी तालुक्यातील उपकेंद्रांवर ठराविक दिवशी लसीकरणाचे नियोजन करावे. निवडलेल्या लाभार्थ्यांना एक दिवस आगोदर निरोप देवून लसीकरणासाठी बोलवावे अशा सूचना थोरात यांनी दिल्या.

हेही वाचा...

कोपरगावात पोलिस बंदोबस्तात लसीकरण

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचेरिया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, प्रशांत शेंडे, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख आदी उपस्थित होते.

आज तालुक्यातील निमगाव भोजापूर, जवळेकडलग, चिकणी, राजापूर, गुंजाळवाडी, घुलेवाडी गावांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करीत थोरात यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. 
 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख