साईबाबांच्या शिर्डीला जाणार, तर हे आधी वाचाच !  - If you are going to Shirdi, read this first! | Politics Marathi News - Sarkarnama

साईबाबांच्या शिर्डीला जाणार, तर हे आधी वाचाच ! 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 18 मार्च 2021

साईसंस्थानचे चार डॉक्‍टर, चार मेट्रन, बारा परिचारिका, प्रत्येकी चार वॉर्ड बॉय, आया, तसेच बरेच स्वच्छता कर्मचारी, असा ताफा संस्थानच्या कोविड रुग्णालयात कार्यरत आहे. 

राहाता : तालुक्‍यात कोविडचा फैलाव वेगाने होत आहे. सरकारी यंत्रणा उपचाराचा भार साईसंस्थानच्या रुग्णालयावर टाकत आहे. शिर्डी, राहाता व लोणी या मोठ्या तीन गावांत कोविडचा फैलाव वेगाने होत आहे. तहसीलदार कुंदन हिरे यांनी लोणी बुद्रुक, लोणी खुर्द व शिर्डी आदी अकरा ठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू केले आहेत, तर राहाता व साकुरी येथे आजपासून दर गुरुवारी "जनता कर्फ्यू' पाळण्यास सुरवात झाली आहे. 

तालुक्‍यात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या 347वर जाऊन पोचली आहे, तरीही सरकारी यंत्रणा साईसंस्थानवर भरोसा ठेवून तटस्थपणे रुग्णसंख्या मोजण्यात धन्यता मानते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर अद्यापही सुरू झालेले नाही. साईसंस्थानने त्यांची गरज म्हणून अतिदक्षता विभाग असलेले डेलिकेटेड कोविड सेंटर सुरूच ठेवले होते. हे जणू काही आपलेच केंद्र आहे, असे समजून त्यास भेटी देण्याचे आणि सूचना करण्याचे कर्तव्य आरोग्य खात्याचे अधिकारी पार पाडतात. साईसंस्थानची दोन्ही रुग्णालये सुरू असल्याने, कोविड रुग्णालयात डॉक्‍टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्याकडे सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान, शिर्डीचे देवस्थान केवळ महाराष्ट्रातच प्रसिद्ध नसून, संपूर्ण देश आणि जगभरातून भाविक येथे येत असतात.

हेही वाचा... गांधी या कारणाने संतापले होते

साईसंस्थानचे चार डॉक्‍टर, चार मेट्रन, बारा परिचारिका, प्रत्येकी चार वॉर्ड बॉय, आया, तसेच बरेच स्वच्छता कर्मचारी, असा ताफा संस्थानच्या कोविड रुग्णालयात कार्यरत आहे. 

तालुक्‍यातील गावे (कंसात रुग्णसंख्या) : 

शिर्डी 76, राहाता 60, लोणी खुर्द 22, लोणी बुद्रुक 36, साकुरी 10, पुणतांबे 18, कोऱ्हाळे 9, नपावाडी 8, नांदुर्खी बुद्रुक 16, पिंपळवाडी 8 रुग्ण. तालुक्‍यात 54पैकी 40 गावांत कोविड रुग्ण आढळत आहेत. 

हेही वाचा... सेवा संस्था होणार आॅनलाईन

व्यापाऱ्यांचा निर्णय

कोविडचा संसर्ग फैलावत असल्याने व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने दर गुरुवारी "जनता कर्फ्यू'चे पालन करायचे ठरविले. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांमुळे फैलावाचा धोका वाढतो. पालिकेतर्फे त्याबाबत आवश्‍यक ती कारवाई केली जाईल. 
- नगराध्यक्ष ममता पिपाडा 

चाचण्या वाढविल्या

तालुक्‍यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली, तरी चाचण्यांची संख्या अधिक आहे. एक ते पंधरा मार्चदरम्यान सरकारी रुग्णालयात तेराशे, तर खासगी प्रयोगशाळेत सातशे आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. 
- कुंदन हिरे, तहसीलदार, राहाता 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख