अकोल्यातील अवैध दारुची गृहमंत्र्यांकडून दखल, अधिकाऱ्यांनी टाकल्या धाडी - Home Minister warns of illegal liquor in Akola | Politics Marathi News - Sarkarnama

अकोल्यातील अवैध दारुची गृहमंत्र्यांकडून दखल, अधिकाऱ्यांनी टाकल्या धाडी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

या पथकाने अकोले, राजूर, कोतुळ येथील अवैध दारुबाबत धाडी घातल्या व अकोले व राजूर येथे कारवाया केल्या आहेत. 

अकोले :(Akole) तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्त यांनी घेऊन आयुक्तांनी नाशिक उत्पादनशुल्क अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवस अकोल्यात पाठवले. (Home Minister warns of illegal liquor in Akola)

या पथकाने अकोले, राजूर, कोतुळ येथील अवैध दारुबाबत धाडी घातल्या व अकोले व राजूर येथे कारवाया केल्या आहेत. इथून पुढेही हे पथक सतत तालुक्यावर लक्ष ठेवून असेल व तक्रारींची दखल घेणार आहे.

लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबात रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुषवर्ग महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करतो आहे. अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबासाठी आवश्यक आहे, असे पत्र आंदोलनाने गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्त यांना लिहिले होते 

अकोल्यातील डोंगरे यांच्या दुकानाबाहेर दारू विक्री करताना या पथकाने कारवाई केली व राजूर येथील अवैध विक्रीवर गुन्हा दाखल केला. या पथकातील नगर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने राजूर, कोतुळ येथे दारू विक्रेत्याना सावध केल्याने कारवाई वर परिणाम झाला हे पुराव्यानिशी आंदोलनाने उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले.

आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते, याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादनशुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठीशी घालत असल्याचे वास्तव पुढे येते आहे. येथील अधिकारी तातडीने बदलावेत, अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे. 

इतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदीपुलाजवळ चोरून विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीत खुलेआम दारू विकली जात आहे. एकीकडे शोकाकुल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणाऱ्या या विक्रेत्याना अकोल्याचे नवीन पोलीस निरीक्षक यांनी पायबंद घालावा व अकोले व राजूर मधील गेल्या ५ वर्षातील झालेल्या कारवाया एकत्र करून त्या आधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचे लायसन रद्द करावे व राजूरमध्ये तडीपारी करावी, अशी मागणी दारूबंदी आंदोलनानेचे  जिल्हाध्यक्ष ऍड रंजना गवांदे, निलेश तळेकर, संतोष मुतडक, संदीप दराडे, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके,डॉ. भाऊराव उघडे व हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रभर अशा पद्धतीची कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा..

प्रस्तावच नाही, हे उत्तर हास्यास्पद

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख