कोरोना काळात राजकारणाला सुट्टी ! शिवसेनेचे हे खासदार घेणार भाजपच्या आमदाराची मदत - Holiday in politics during Corona era! This Shiv Sena MP will take the help of BJP MLA | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना काळात राजकारणाला सुट्टी ! शिवसेनेचे हे खासदार घेणार भाजपच्या आमदाराची मदत

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 15 एप्रिल 2021

त्यांच्याकडे मोठ्या संख्येने अनुभवी व शिकाऊ डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी व मोठी रुग्णालये आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील जनतेला या संकट काळात होईल.

शिर्डी : "जिल्हा कोरोना संसर्गाच्या संकटात सापडला आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. अशा संकट काळात राजकारण करणार नाही. आम्ही आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊ. विळद घाट व लोणी येथील त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन मोठी कोविड रुग्णालये तातडीने सुरू करावीत, अशी मागणी त्यांच्याकडे करू,'' अशी भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी घेतली आहे. 

त्यांच्याकडे मोठ्या संख्येने अनुभवी व शिकाऊ डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी व मोठी रुग्णालये आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील जनतेला या संकट काळात होईल, असेही ते म्हणाले. 

लोखंडे यांनी आज साईसंस्थानच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. तेथील नियोजित ऑक्‍सिजन सुविधायुक्त बेडची पाहणी केली. या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे व डॉ. मैथिली पीतांबरे आदी उपस्थित होते. या वेळी कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन चौगुले आदी उपस्थित होते. 

लोखंडे म्हणाले, ""लोणी व विळद घाटात आणखी दोन मोठी रुग्णालये सुरू झाली, तर जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळेल. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी साईसंस्थानच्या तदर्थ समिती सदस्यांसमवेत चर्चा केली. कोरोना संकट काळात साईसंस्थानने कोरोना रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठीच्या खर्चास मान्यता द्यावी, अशी मागणी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या निर्यातीस बंदी घातल्याने, निर्यात कोट्यातील इंजेक्‍शन राज्याला काही प्रमाणात मिळतील. येत्या तीन-चार दिवसात या इंजेक्‍शनची टंचाई दूर होईल. नगर येथे आता आणखी एक कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्याने आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल चोवीस तासांत मिळतील, असे आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.'' 

रेमडेसिव्हिरचे उत्पादन वेगात

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची निर्मिती केल्यानंतर पंधरा दिवसांनी त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे उत्पादन वेगाने सुरू झाले असले, तरी अद्याप इंजेक्‍शन बाजारात आली नाहीत. येत्या तीन-चार दिवसांत तुटवडा नक्की दूर होईल, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख