इकडे कोरोचा कहर, यांना सुचतात पक्षनिष्ठेच्या गप्पा - Here, Korocha's havoc suggests party loyalty chats | Politics Marathi News - Sarkarnama

इकडे कोरोचा कहर, यांना सुचतात पक्षनिष्ठेच्या गप्पा

संजय आ. काटे
बुधवार, 28 एप्रिल 2021

श्रीगोंदे तालुका मात्र याला अपवाद आहे. विधानसभेची निवडणूक अद्याप लांब आहे. सध्या जगण्याला आणि जगविण्यालाच प्राधान्य हवे.

श्रीगोंदे : महाराष्ट्राच्या आणि नगरच्याही राजकारणात अनेक नेत्यांनी वर्षानुवर्षे एकाच पक्षात राहून पक्षनिष्ठा सांभाळली. हल्ली मात्र स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे आपण पाहतो; मात्र बहुतेकांना मतदारांनी त्यांची जागा दाखविल्याचे दिसून येते.

श्रीगोंदे तालुका मात्र याला अपवाद आहे. विधानसभेची निवडणूक अद्याप लांब आहे. सध्या जगण्याला आणि जगविण्यालाच प्राधान्य हवे. अशाही स्थितीत लागलेले "डोहाळे' किती दिवस टिकणार आणि महत्त्वाचे म्हणजे पक्षनिष्ठेच्या गप्पा कोणी माराव्यात? त्यांना या सुचतात तरी कशा, असा मोठा प्रश्‍न आहे. 

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील एकेकाळच्या सर्वांत दुष्काळी असलेल्या श्रीगोंद्याचे नाव आता राज्यातील सिंचनाच्या बाबतीत पहिल्या पाच तालुक्‍यांत घेतले जाते. अर्थात, गेल्या काही वर्षांत याच पाणीप्रश्नात दर वर्षी आंदोलने होऊन तेथील राजकीय गादीची उलथापालथ झाली, हेही वास्तव आहे.

या तालुक्‍यात समस्यांचा महापूर असताना, सध्या मात्र पक्षनिष्ठेच्या गप्पा मारून नेतेमंडळी नेत्यांना खूष करण्याच्या प्रयत्नात गुंतली आहेत. विधानसभेला अजून वेळ आहे. श्रीगोंद्याचा इतिहास पाहता, कोणीही पक्षनिष्ठेच्या गप्पा एवढ्या लवकर तरी मारण्यात काही अर्थ नाही, हे मात्र खरे आहे. 

विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप यांनी सत्ता व कारखाना यांच्या माध्यमातून श्रीगोंद्याला विकासाच्या वळणावर आणले. अर्थात, यात अनेकांचा सहभाग आहे. मात्र, आजही हा तालुका अनेक समस्यांनी ग्रासला आहे, हेही नाकारून चालत नाही. कुकडी प्रकल्पात तीन जिल्हे व सात तालुक्‍यांचा सहभाग आहे; मात्र पाण्याची राजकीय चर्चा केवळ श्रीगोंद्यातच होते, हे दुर्दैव आहे. कारण, इतर तालुके चर्चा कमी करतात आणि पाण्याचे सिंचन जास्त करतात. याच तालुक्‍यातून मंजूर झालेले कृषी महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय कर्जत-जामखेडला गेले. निवडणुकांपुरती समस्यांची चर्चा करणारे येथील नेते विकासात्मक बाबतीत गंभीर नसल्याचे वास्तव अनेक वेळा अधोरेखित झाले आहे. 

सध्या गाजतोय कोण कोणत्या पक्षातून विधानसभा लढणार आणि आमदार होणार याचीच. राष्ट्रवादीचे दोन नेते घनश्‍याम शेलार व राहुल जगताप यांनी हा मुद्दा पुढे करीत, त्यांनाच पक्षाची उमेदवारी राहील आणि त्यासाठी नेतेही त्यांनाच अनुकूल असल्याचे तोऱ्यात सांगितले. मात्र सध्या नेत्यांनी या राजकीय गोष्टींना लगाम घालताना सामान्यांना आधार दिला पाहिजे आणि त्यातच श्रीगोंदेकरांनी तर पक्षीय निष्ठेबाबत न बोललेले बरे. 

विद्यमान आमदार बबनराव पाचपुते प्रत्येक विधानसभा निवडणुकीला वेगळ्या चिन्हावर लढले आहेत. घनश्‍याम शेलार यांनी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व पुन्हा राष्ट्रवादी, असा प्रवास केला आहे, तर जगताप यांनीही विधानसभेला भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. शिवाय, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी त्यांची जवळीक कायम चर्चेत आहे.

राजेंद्र नागवडे यांनी सिद्धटेकला भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यात सत्ता आघाडीची आली, की ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे "निष्ठावंत' झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हेही अनेक पक्षांतून फिरून आलेले आहेत. त्यामुळे विधानसभेला अजून काही वर्षे वेळ असताना आज, मरेपर्यंत त्याच पक्षात राहणार किंवा नेत्यांनी त्यांनाच शब्द दिला, ही विधाने बासनात गुंडाळली पाहिजेत. सध्या वेळ आहे, येथील मूळ समस्यांवर एकत्रित येऊन तोडगा काढण्याची. येथील नेत्यांनी अशा प्रश्नी झालेली एकीच तालुका सुजलाम्‌ृ- सुफलाम्‌ करण्यास उपयोगी ठरेल! 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख