त्याचा जीव गेला, पण रेमडेसिव्हीर मिळालेच नाही ! मनपा कामगार संघटना आक्रमक - He died, but did not receive remedivir! Municipal trade unions are aggressive | Politics Marathi News - Sarkarnama

त्याचा जीव गेला, पण रेमडेसिव्हीर मिळालेच नाही ! मनपा कामगार संघटना आक्रमक

अमित आवारी
मंगळवार, 20 एप्रिल 2021

शहरात कोरोनाने थैमान घातला आहे. यातच महापालिकेचे 11 कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असताना तीन कर्मचारी काल अत्यावस्थ होते. त्यातील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन तातडीने देण्यात यावे, असे डॉक्‍टरांनी सांगितले होते.

नगर : महापालिकेचे दोन कोरोना बाधित कर्मचारी काल खासगी रुग्णालयात अत्यावस्थ स्थितीत होते. नगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार महापालिका आयुक्‍त, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदींशी संपर्क साधून रेमडेसिव्हिरची मागणी केली, तरीही रेमडेसिव्हिर मिळाले नाही. यातील एका कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. 

शहरात कोरोनाने थैमान घातला आहे. यातच महापालिकेचे 11 कर्मचारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले असताना तीन कर्मचारी काल अत्यावस्थ होते. त्यातील दोन कर्मचाऱ्यांना रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन तातडीने देण्यात यावे, असे डॉक्‍टरांनी सांगितले होते. त्यानुसार महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार, महापालिका आयुक्‍त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आदींशी संपर्क साधत तातडीने रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याची याचना केली. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी हतबलता दाखविली. अखेर यातील अत्यावस्थ असलेल्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू झाला. महापालिकेचे आणखी दोन कर्मचारी अत्यावस्थ आहेत. 

हेही वाचा...

बेफिकीर व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर चर्चा 

नगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची कोरोना चाचणी करावी, असे मत महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी बैठकीत व्यक्त केले. त्यावर सर्वांची चर्चा झाली आहे, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लक्षणे जास्त असलेल्या रुग्णांना दवाखान्यामध्ये बेड वेळेवर मिळत नाहीत. रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काय उपाय योजना करता येतील, यादृष्टीने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. तिला स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, उपमहापौर मालन ढोणे, रोहिणी शेंडगे, सुप्रिया जाधव, संजय ढोणे, भाजप मंडल अध्यक्ष अजय चितळे, सतीश शिंदे, सचिन जाधव, अनिल बोरुडे आदी उपस्थित होते. 

रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे ऑक्‍सिजन प्लॅंट उभारण्यात यावा, अशी मागणी या वेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केली. महापालिकेतर्फे मोठे रुग्णालय उभारावे; भविष्यामध्ये गोरगरीब रुग्णांना त्यामध्ये उपचार घेता येतील. अशी कामे भविष्याच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याला पायबंद घालण्यासाठी त्यांची अँटिजेन तपासणी करण्यात यावी, यावरही बैठकीत चर्चा झाली. त्यावर महापौरांनी, या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन तपासणी करू, असे सांगितले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख