पालकमंत्री मुश्रीफ यांनी कानउघडणी केली अन वाळूतस्करांच्या सहा बोटी फोडल्या - Guardian Minister Mushrif opened his ears and smashed six boats carrying sand | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री मुश्रीफ यांनी कानउघडणी केली अन वाळूतस्करांच्या सहा बोटी फोडल्या

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 मे 2021

श्रीगोंदे-कर्जत परिसरात होत असलेल्या वाळु तस्करीबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

कर्जत : तालुक्‍यातील गणेशवाडी शिवारातील भीमा नदीपात्रात पोलिसांनी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. यात 24 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तर दोघांना अटक करण्यात आली.

दरम्यान, श्रीगोंदे-कर्जत परिसरात होत असलेल्या वाळु तस्करीबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात वाळुतस्कराविरोधात धडक मोहीम घेण्याची शक्यता आहे.

याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. 

पोलिस निरीक्षक यादव यांना गणेशवाडी (ता. कर्जत) येथे भीमा नदीपात्रात काही व्यक्ती यांत्रिक बोटीच्या साह्याने अवैध वाळूउपसा करीत असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिरसाठ यांच्यासह पथकाने तेथे कारवाई केली. यावेळी पंधरा लाख रुपये किमतीच्या तीन यांत्रिक फायबर बोटी व नऊ लाख रुपये किमतीच्या तीन सक्‍शन बोटी, असा एकूण चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. लहू बबलू शेख (रा. पिअरपूर, झारखंड), शौकत बच्चू शेख (रा. पळसगच्ची, झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. 

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भरत बलभीम अमनर, शरद शेंडगे (दोघे रा. वाटलूज, ता. दौंड, जि पुणे), दत्तात्रय विक्रम खताळ, अंकुश ठोंबरे (दोघे रा. गणेशवाडी, ता. कर्जत) यांची नावे सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. लहू शेख व शौकत शेख यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

हेही वाचा...

राहुरीतून दोन दुचाकींची चोरी 

राहुरी : तालुक्‍यात दोन ठिकाणी राहत्या घरासमोरून दुचाकीचोरीच्या घटना घडल्या. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनील मच्छिंद्र सागर (रा. घोरपडवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की घोरपडवाडी येथे रविवारी (ता. 23) रात्री साडेदहा ते सोमवारी (ता. 24) पहाटे पाचदरम्यान घरासमोर लावलेली दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 17 जे 8237) अज्ञात चोरट्यांनी लांबविली. दुसऱ्या फिर्यादीत भिकाजी विनायक तांबे (रा. वांबोरी) यांनी म्हटले आहे, की वांबोरी येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री साडेदहा ते शनिवारी (ता. 22) पहाटे चारदरम्यान राहत्या घरासमोरून दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच-17 एपी 3032) अज्ञात चोरट्यांनी लांबविली. 

 

हेही वाचा..

नगर जिल्ह्याने केला अडीच हजाराचा आकडा पार

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख