पाच वर्षे पालकमंत्री होता, आता कशाला कुकडीबाबत आव आणता, घनश्याम शेलार यांचे प्रत्युत्तर

शिंदे सत्ता असताना "हवे'त होते. त्यांचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. सत्तेची ऊब त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
Ram shinde and ghanasham shelar.jpg
Ram shinde and ghanasham shelar.jpg

श्रीगोंदे : ""कुकडी'च्या पाण्याचा कळवळा असल्याचा आव आणून राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या माजीमंत्री राम शिंदे यांना भूतकाळाचा विसर पडला आहे. त्यांच्याकडे पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यावेळी "कुकडी'चे पाणी मिळाले व आंदोलने झालीच नाहीत, हा त्यांचा दावा स्वार्थीपणाचा आहे. पाच वर्षे पालकमंत्री होता, मुख्यमंत्र्यांचे उजवे हात होता मग बोगद्याचे काम का नाही करून घेतले,'' असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी केला. 

शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर "कुकडी' पाणीप्रश्नी टीका केली होती. त्यावर शेलार म्हणाले, ""शिंदे सत्ता असताना "हवे'त होते. त्यांचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. सत्तेची ऊब त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्या काळात शेतकऱ्यांचे किती हाल झाले, याचे भान त्यांना नाही. सत्ता असल्यावर शिंदे यांना सामान्य माणसे दिसत नाहीत. पालकमंत्रिपदाची झलक दाखविण्यासाठी ते कायम "हवे'त राहिले आणि रोहित पवार यांनी सामान्य लोकांच्या मनात घर करून त्यांना नुसते जमिनीवरच आणले नाही, तर भुईसपाट केले. त्यामुळेच ते आता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करून पाण्याचा पुन्हा खेळ करायला पाहत आहेत.'' 

""शिंदे यांच्या काळात "कुकडी'च्या पाण्यासाठी आंदोलनेच झाली नाहीत, हा त्यांचा दावा हास्यास्पद आहे. "कुकडी'च्या पाण्यासाठी त्यांच्या काळात एकही वर्ष बिगर आंदोलनाचे गेले नाही, हे शिंदे यांच्या लक्षात नाही. ते पालकमंत्री असतानाच श्रीगोंद्यावर सर्वाधिक अन्याय झाला,'' असा आरोप शेलार यांनी केला. 

""भाजपच्या काळात श्रीगोंद्यावर शिंदे यांनी आवर्तनकाळात पोलिसांची दहशत ठेवली. त्यांना आज पुणेकर पाणी अडवितात असे वाटते; मग त्यांच्या सत्तेच्या काळात नेमके कोणी पाणी अडविले होते, याचे उत्तरही त्यांनी द्यावे.

कर्जतमध्ये "कुकडी' नेण्यात शिंदे यांचे योगदान शून्य आहे. तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांनी कर्जतला, दिगंबर बागल यांनी करमाळ्याला आणि आपण श्रीगोंद्यात हे पाणी आणले. त्यामुळे शिंदे यांनी याप्रश्‍नी हुरळून जाऊ नये. पाच वर्षे आपण पालकमंत्री होता, मुख्यमंत्र्यांचे उजवे हात होता; मग डिंभे ते माणिकडोह बोगदा का नाही करू शकले? आता हाती काहीच राहिले नाही म्हणून राजकीय गप्पा करणे शिंदे यांनी बंद करावे,'' असाही टोला शेलार यांनी लगावला. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com