तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहा : मुख्यमंत्री ठाकरे - Get ready for the third wave: Chief Minister Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहा : मुख्यमंत्री ठाकरे

सतीश वैजापूरकर
बुधवार, 19 मे 2021

शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. आता ठिकठिकाणी ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारून राज्याची दैनंदिन तीन हजार टन ऑक्‍सिजनची गरज राज्यातच भागविण्यात येईल.

शिर्डी : "साईसंस्थानने(Sai Sansthan) उभारलेला ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प व आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे कोविड संसर्ग रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. कोविडची सध्याची दुसरी लाट ओसरत आहे. (Get ready for the third wave: Chief Minister Thackeray)

शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. आता ठिकठिकाणी ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प उभारून राज्याची दैनंदिन तीन हजार टन ऑक्‍सिजनची गरज राज्यातच भागविण्यात येईल,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

रिलायन्स फाउंडेशन व साईभक्त के. व्ही. रमणी यांच्या देणगीतून साईसंस्थानच्या तीनशे ऑक्‍सिजन बेड कोविड रुग्णालयासाठी हवेतून ऑक्‍सिजननिर्मितीचा प्लॅंट, तसेच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने झाला. त्यावेळी ते बोलत होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, श्री साईबाबा विश्‍वस्त संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदींसह रिलायन्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग घेतला.

ठाकरे म्हणाले, ""साईसंस्थानचा ऑक्‍सिजननिर्मिती प्रकल्प रुग्णांचे जीव वाचवेल, तर आरटीपीसीआर चाचणीदेखील उपयुक्त ठरेल. साईसंस्थानने नेहमीच संकटात मदतीचा हात पुढे केला आहे.'' 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ""राज्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी उपाययोजना केली, त्याची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालय व उच्च न्यायालयानेदेखील घेतली. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी करीत आहोत.'' 

प्रास्ताविकात बगाटे म्हणाले, की सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्लॅंटमुळे साईसंस्थान कोविड रुग्णालयाची ऑक्‍सिजनची गरज भागेल. रवींद्र ठाकरे यांनी आभार मानले. 

संकट रोखू ः थोरात

नगर जिल्ह्यात मध्यंतरी कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. ती आता घटत आहे. चाचण्यांची संख्या वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे संकट रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ. 
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 
 

हेही वाचा....

कुकडीचे आवर्तन 20 मे पासून

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख