माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनाने निधन - Former Union Minister Dilip Gandhi dies in Corona | Politics Marathi News - Sarkarnama

माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोरोनाने निधन

मुरलीधर कराळे
बुधवार, 17 मार्च 2021

गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे दिल्लीतीलच रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. काल त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. मृत्यूसमयी त्यांच्यासमवेत पत्नी व दोन्ही मुले होती.

नगर : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप मनसुखलाल गांधी (वय 70) यांचे आज (बुधवारी) पहाटे दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दिल्लीतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी हे त्यांचे पूत्र होत. 

गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे दिल्लीतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. काल त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. मृत्यूसमयी त्यांच्यासमवेत पत्नी व दोन्ही मुले होती. 

भाजपचे कट्टर कार्यकर्ते

गांधी यांचा जन्म 9 मे 1951 रोजी दाैंड येथे झाला. जैन समाजात त्यांचे मानाचे स्थान होते. नगर जिल्ह्यात त्यांनी सुरुवात भाजपच्या पदाधिकाऱ्यापासून केली. नगर पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1985 मध्ये ते नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. भाजपच्या जिल्हा संघटनेत त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस तसेच इतर विविध पदे भूषविले. अखेरपर्यंत त्यांनी भाजपची साथ सोडली नाही.

हेही वाचा... नगर जिल्ह्यातील सेवा संस्था होणार आॅनलाईन

तिनदा खासदार

अहमदनगर जिल्हा मतदारसंघातून (दक्षिण) गांधी हे तीनदा खासदार होते. 1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. या दरम्यानच्याकाळात ते वित्त मंत्रालयाच्या समितीचे सदस्यही होते. केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी 2003 मध्ये काम पाहिले. 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते लोकसभेत खासदार म्हणून गेल्यानंतर एक हुशार खासदार म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मिळाली. मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला.

हेही वाचा... आम्ही निधी मंजूर केला

संसदेत हुशार खासदार म्हणून त्यांची ख्याती होती. भाजपच्या श्रेष्ठींशी त्यांचे कायम चांगले संबंध राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिकीट नाकारले, तरीही त्यांनी पक्षाच्या आदेशाने प्रचाराचे काम केले. उमेदवारी मिळणे महत्त्वाचे नसून, पक्षाचा आदेश हेच प्रमाण मानत त्यांनी काम सुरू ठेवले होते. तसेच नगर जिल्ह्यात नावाजलेल्या अर्बन बॅंकेचे ते अध्यक्ष होते.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख