खावटी योजनेचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात - The first installment of Khawati scheme will soon be in the beneficiary's account | Politics Marathi News - Sarkarnama

खावटी योजनेचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थींच्या खात्यात

विलास कुलकर्णी
बुधवार, 7 एप्रिल 2021

आदिवासी समाजासाठी असलेली खावटी योजना मागील भाजपा सरकारने बंद केली होती. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खावटी योजना पूर्ववत सुरू केली.

राहुरी : नगर जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी खावटी योजनेतून पहिल्या हप्त्यापोटी पाच कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिला हप्ता रुपये दोन हजार प्रमाणे रक्कम लवकरच प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

मंत्री तनपुरे म्हणाले, "आदिवासी समाजासाठी असलेली खावटी योजना मागील भाजपा सरकारने बंद केली होती. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खावटी योजना पूर्ववत सुरू केली. राज्यातील आदिवासी बांधवांना योजनेचा मोठा लाभ होणार आहे.``

नगर जिल्ह्यातील 28 हजार लाभार्थी आदिवासी कुटुंबांना योजनेचा लाभ होईल. राहुरी विधानसभा मतदार संघातील राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यातील दोन हजार 427 लाभार्थ्यांना 48 लाख 54 हजार रुपयांचा लाभ होईल. कोरोनामुळे आदिवासी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यातून सावरण्यासाठी खावटी योजनेची मदत होईल, असे तनपुरे यांनी सांगितले. 

 

हेही वाचा...

ज्येष्ठ नागरिकांनी लस घेणे आवश्यक

शेवगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता 45 वर्षांपुढील प्रत्येक नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनावरील लस घेवून प्रशासनास सहकार्य करावे. लसीकरणानंतरही नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे काटकोर पालन करुन स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केले.

प्रांताधिकारी केकाण यांनी तालुक्यातील चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील लसीकरणाची माहिती घेतली. डॉ. गायित्री कुमावत, महसूल विभागाचे नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.

लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती जणांनी लस घेतली, लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी काय प्रयत्न केले, याचा आढावा त्यांनी घेतला. चापडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 23 गावांतील 666 लोकांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. गायित्री कुमावत यांनी सांगितले.

हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही प्रांताधिकारी केकाण यांनी भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणार असल्याचे प्रांताधिकारी केकाण यांनी सांगितले. 
 

Edited By - Mulidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख