फेसबूक फ्रेंडशीप अशी पडली महागात ! मारहाण अन विनयभंगाची धमकी - Facebook friendship is so expensive! Threats of beatings and molestation | Politics Marathi News - Sarkarnama

फेसबूक फ्रेंडशीप अशी पडली महागात ! मारहाण अन विनयभंगाची धमकी

आनंद गायकवाड
मंगळवार, 20 जुलै 2021

अकोले तालुक्यातील तक्रारदाराच्या फेसबूक अकाऊंटवर दोन महिन्यांपूर्वी आलेली एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली. त्यानंतर फेसबुकवरुन मोबाईल नंबर मिळवून ती त्या 46 वर्ष वयाच्या सधन शेतकऱ्याशी संपर्क ठेवू लागली.

संगमनेर : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिष्ठीत व्यक्तीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करुन, त्यांना संगमनेरमधील (Sangamner) मावशीच्या घरी चहाला बोलावून, त्यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांचा मोबाईल व खिशातील पैसे काढून घेवून मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. (Facebook friendship is so expensive! Threats of beatings and molestation)

अकोले तालुक्यातील तक्रारदाराच्या फेसबूक अकाऊंटवर दोन महिन्यांपूर्वी आलेली एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली. त्यानंतर फेसबुकवरुन मोबाईल नंबर मिळवून ती त्या 46 वर्ष वयाच्या सधन शेतकऱ्याशी संपर्क ठेवू लागली. 6 जून 2021 रोजी दुपारी ते कामानिमित्त संगमनेरला आले असताना, या संधीची वाट पहाणाऱ्या त्या महिलेने अन्य दोन महिलांसह एका पेट्रोलपंपावर त्यांची भेट घेत त्यांना आग्रहाने गणेशनगरमधील मावशीच्या घरी चहाच्या निमित्ताने नेले. त्यानंतर घराचा पडदा टाकून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्यांना अश्लिल शिवीगाळी करीत तीघींनी मारहाण केली व खिशातील एक हजार रुपये काढून घेतले.

महिला असल्याने त्याने प्रतिकार केला नाही. मात्र त्याला शिवीगाळी करीत त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. न दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी फेसबुक फ्रेंडने दिली. त्यांच्या ताब्यातून हातापाया पडून सुटका करुन घेतल्यानंतर ती व्यक्ती त्या घरापासून काही अंतरावर मोबाईलसाठी थांबून राहिली. थोड्या वेळाने त्यातील दोघी मोपेडवरुन निघाल्यानंतर त्या व्यक्तीने मोटारीतून पाठलाग करुन त्यांना अकोले बायपासच्या कसारा दुमाला पुलाजवळ अडवले व पुन्हा मोबाईलची मागणी केली. त्यामुळे त्या दोघींनी त्याला रस्त्यावर शिवीगाळी करीत या व्यक्तीने छेडछाड केल्याचा कांगावा केला.

दरम्यान, तिने फोन केल्याने रायतेवाडीकडून एका विटकरी रंगाच्या मोटारीतून दोन पुरुष घटनास्थळी आले. त्यांच्या समोर त्या दोघींनी पु्न्हा शिवीगाळी करीत त्याला मारहाण केली. हा प्रकार पहाण्यासाठी जमलेल्या लोकांसमोर त्यांनी छेडछाड केल्याचा कांगावा केला असता, त्या व्यक्तीने मी शेतकरी असून, या महिलांनी मारहाण करुन मोबाईल व पैसे लुटल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यातील एक महिला मोटारीत बसून व दुसरी मोपेड घेवून नाशिकच्या दिशेने निघून गेल्या.

घाबरलेल्या त्या व्यक्तीने अकोले गाठून आपल्या कुटुंबियांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र दुर्दैवाने त्यांचे कुटुंबिय कोवीड बाधीत झाल्याने या बाबत तक्रार देता आली नाही. त्यामुळे आज त्यांनी संगमनेर गाठून आपली कैफियत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांच्या कानावर घातली. त्यानुसार रात्री संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

हेही वाचा..

कोविड प्रकोपात जनतेसोबत राहिलो

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख