सरपण पुरेणा, मरण टळेना ! एकाच दिवशी 65 जणांवर अंत्यसंस्कार - Enough firewood, death is not averted! 65 people were cremated on the same day | Politics Marathi News - Sarkarnama

सरपण पुरेणा, मरण टळेना ! एकाच दिवशी 65 जणांवर अंत्यसंस्कार

अमित आवारी
गुरुवार, 22 एप्रिल 2021

नालेगाव अमरधाममध्ये मागील दोन दिवसांत 130, तर 14 दिवसांत 656 कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात 65 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले.

नगर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनअभावी शहरातील आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. नालेगाव अमरधाममध्ये मागील दोन दिवसांत 130, तर 14 दिवसांत 656 कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात 65 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. 

शहरात सध्या ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता आहे. त्यामुळे बेड न मिळाल्याने, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वेळेत न मिळाल्याने रुग्णांची मृत्यू संख्या वाढत आहे. नगर शहरात नालेगाव, नागापूर, केडगाव व स्टेशन जवळील अमरधाममध्ये मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्काराची व्यवस्था आहे. मात्र नालेगाव अमरधाममध्ये प्रामुख्याने मृत कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार होत आहेत. याशिवाय आता जिल्ह्यातील विविध ठिकाणीही मृत कोरोनाबाधित रुग्णांवर आता अंत्यसंस्कार होत आहेत. 

नालेगाव अमरधाममध्ये परवा (ता. 20) 65, तर काल (ता. 21) रात्री आठ वाजेपर्यंत 65 कोरोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज 20 मृतदेहांवर विद्युत दाहिनीत, तर उर्वरित 45 मृतदेहांना सरणावर अग्निडाग देण्यात आला. त्यामुळे आज सायंकाळी अमरधाममध्ये सर्वत्र सरणे पेटलेली दिसत होती. मृत कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक लांबूनच हताशपणे अंत्यसंस्कार पाहात होते. 

14 दिवसांत 656 अंत्यसंस्कार 

ता. 8 पासून 21 एप्रिलपर्यंत अनुक्रमे एका दिवसात करण्यात आलेले अंत्यसंस्कार 42, 49, 18, 17, 43, 41, 42, 50, 57, 55, 55, 57, 65, व 65 

 

हेही वाचा..

कोरोनाचा कहर थांबेना 

नगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेना. जिल्ह्यात आज तीन हजार 117 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 21 हजार 989 झाली आहे. जिल्ह्यात आज 2384 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 21 हजार 625 झाली आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी प्रयोगशाळेमध्ये 420, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1176 आणि अँटिजेन चाचणीत 1521 रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्यात जनता कर्फ्यू असता, तरी सकाळी 11 वाजेपर्यंत रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होत आहे. यातच आता कोरोना लसीचा तुटवडाही जाणवू लागला आहे.

नगर शहरातील आरोग्य केंद्रांत प्रत्येकी केवळ 40 लसीच प्राप्त होत आहेत. मात्र या केंद्रांसमोर 200 ते 250 नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत. लस न मिळाल्याने निराश होऊन नागरिक घरी परतत आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख