फुकट मिळेना, विकत लस घ्या ! थोरात कारखान्याचा निर्णय ठरतोय वादग्रस्त - Don't get it for free, buy the vaccine! The decision of the Thorat factory is controversial | Politics Marathi News - Sarkarnama

फुकट मिळेना, विकत लस घ्या ! थोरात कारखान्याचा निर्णय ठरतोय वादग्रस्त

आनंद गायकवाड
शनिवार, 29 मे 2021

अनेक संस्थांनी पैसे आकारुन का होईना परंतु लसीची कवचकुंडले आपल्या कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत.

संगमनेर : सरकारकडून मोफत लस वेळेत उपलब्ध होईना. त्यामुळे ज्यांना तातडीने गरज आहे, अशा कामगारांसाठी विकत लस घेण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे. दरम्यान, मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप काही लोकांनी केला आहे. (Don't get it for free, buy the vaccine! The decision of the Thorat factory is controversial)

खासगी रुग्णालय व्यवस्थापनामार्फत ऐच्छिक सशुल्क लसीकरण करण्यासंबंधीचा निर्णय घेतला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

कोरोनावर प्रभावी उपाययोजना असलेल्या लसीकरणासाठी अनेकांना मोठी यातायात करावी लागत आहे. देशात या दरम्यान लसीकरण पर्यटनाचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अनेक संस्थांनी पैसे आकारुन का होईना परंतु लसीची कवचकुंडले आपल्या कामगारांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या मोफत लसीकरण योजनेतील लस उपलब्ध नसल्याने किंवा मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने अनेकांचे लसीकरण रखडले असून, शासकिय यंत्रणेमार्फत लसीच्या उपलब्धतेप्रमाणे जमेल तसे लसीकरण सुरु आहे.

या पार्श्वभुमिवर संगमनेरातील एका खासगी रुग्णालय व्यवस्थापनाने थोरात कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व कर्मचाऱ्यांना सशुल्क लसीकरण करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी 26 मे रोजी परिपत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती कामगारांना दिली होती. या परिपत्रकात लसीकरणाच्या कोविशिल्डसाठी एक हजार, कोव्हॅक्सिनसाठी बाराशे तर स्फुटनिकसाठी दिड हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे. लस घेवू इच्छीणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवडीप्रमाणे अपेक्षित रक्कम संबंधित संस्थेला कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात करुन देण्यात येणार असल्याचे तर अन्य कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे पैसे रोख भरावे लागणार असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र हे परिपत्रक व्हायरल झाल्याने थोरात विरोधकांनी या निर्णयावर सोशल माध्यमातून टीका केली आहे.

शासनाने खासगी लसीकरण केंद्रांना अडीचशे रुपये आकारण्यास परवानगी दिली असल्याने, मनमानी शुल्क आकारण्याचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांचे म्हणणे आहे. 

या बाबत कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली असता, आलेल्या कोणत्याही नवीन सूचना कामगारांपर्यंत पोचविण्याची पध्दत असल्याने केवळ त्यांच्या माहितीसाठी परिपत्रक काढले होते. कारखान्याच्या सुमारे बाराशे कामगारांना लसीकरणासाठी पंधरवड्यापूर्वीच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना लस उपलब्ध करुन देण्याचे पत्र दिले आहे. मात्र जोखमीचे रुग्ण असलेल्या कामगारांना लस घेण्याची घाई असल्यास, ते या संबंधी विचार करु शकतील या उद्देशाने माहिती दिली होती.

ही योजना पूर्णपणे ऐच्छीक असल्याने सक्ती करण्याचा प्रश्नच येत नाही. यासाठी अद्याप एकाही कामगाराने नोंदणी केलेली नाही. मात्र या परिपत्रकाचा सोईनुसार अर्थ काढून टीका करण्यात आली असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.
 

हेही वाचा...

दिलासादायक, नगरचा कोरोना होतोय कमी

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख