`अंनिस`ला `त्या` कोविड सेंटरमधील एका बाबाने दिलेली चाटणे दिसत नाहीत का? सुजित झावरे यांचा प्रश्न - Doesn't Annis see the licks given to him by a dad at the Covid Center? Question by Sujit Jhaware | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

`अंनिस`ला `त्या` कोविड सेंटरमधील एका बाबाने दिलेली चाटणे दिसत नाहीत का? सुजित झावरे यांचा प्रश्न

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

रुग्णांसाठी ईश्‍वराजवळ प्रार्थना करणे गुन्हा असेल, तर मी गुन्हा केला आहे. मात्र त्याच तालुक्‍यातील एका कोविड सेंटरमध्ये एका बाबाने रुग्णाला दिलेली चाटणे अंनिसला दिसत नाहीत.

नगर : कोरोना (Corona) बाधितांसाठी मी श्रद्धेने कोविड सेंटरपासून दूर केलेल्या विश्‍वशांती यज्ञाला अंधश्रद्धा निर्मुलन समिती अंधश्रद्धा ठरवत आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ट्‌विट केले. रुग्णांसाठी ईश्‍वराजवळ प्रार्थना करणे गुन्हा असेल, तर मी गुन्हा केला आहे. मात्र त्याच तालुक्‍यातील एका कोविड सेंटरमध्ये एका बाबाने रुग्णाला दिलेली चाटणे अंनिसला दिसत नाहीत. यावरून अंनिसच्या तक्रारीला राजकीय वास येत असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पत्रकार परिषदेत केला. (Doesn't Annis see the licks given to him by a dad at the Covid Center? Question by Sujit Jhaware)

सुजित झावरे म्हणाले की, टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) येथे मी स्व. वसंतराव झावरे कोविड सेंटर चालवितो. या कोविड सेंटरचे मी उद्‌घाटन केले नाही, अथवा तेथे सेलिब्रिटी आणून फोटो सेशनही केले नाही. तेथील रुग्णांसाठी मी कोविड सेंटर बाहेर काही अंतरावर गुरुवारी (ता. 20) हिंदू धर्मशास्त्रानुसार विश्‍वशांती यज्ञ केला. यामागे रुग्ण बरे व्हावेत अशी माझी श्रद्धा होती. हा यज्ञ मी माझ्या खासगी शाळेत केला. 
यज्ञ अथवा हवनाचा उल्लेख पुराण, वेद, ज्ञानेश्‍वरीसह धार्मिक ग्रंथांत आहे.

लग्न करतानाही आपण होम करतो. मग तेही चुकीचे आहे का? विदेशात व केंब्रिज विद्यापीठात वेद, होम हवनावर पीएचडी होत आहेत. होम हवन ही श्रद्धा आहे. तिला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. रुग्णांसाठी ईश्‍वराजवळ प्रार्थना केली तर गुन्हा काय? इतर कोविड सेंटरमध्ये रुग्णांसमोर नृत्यांगणांची लावणी झाली. महिला रुग्णांनाही नाचायला लावले. शिट्ट्या वाजल्या. एका बाबाने येऊन रुग्णांना चाटण दिले. मंत्री आले. त्यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. हे अंनिसला का दिसले नाही, असा सवाल त्यांनी केला. 

मी केलेला विश्‍वशांती यज्ञ हा कोविड सेंटर बाहेर होता. राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान संस्थेने केलेल्या प्रयोगानुसार पिंपळ, खैर, पलाश, तूप, गौरी आदी जाळल्याने जंतू मरतात, असे सिद्ध झाले आहे. अध्यात्म व विज्ञानाची सांगड घालायला हवी. ज्यांचा या वैश्‍विक शक्‍तीवर विश्‍वास नाही, ते याला थोतांड म्हणतील. अंनिसच्या तक्रारीत बाहेरच्या पक्षाच्या लोकांचा हात असल्याचा वास येत आहे. तुमच्या जवळ सत्ता आहे. म्हणजे काहीही बोलता येत नाही. ही भांडण करायची वेळ नाही. यात कोणी राजकारण आणू नये, असा सल्लाही सुजित झावरे यांनी दिला. 

 

हेही वाचा...

मोबाईल नेटवर्क कामगारांचे लसीकरण करा

नगर : सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कामगारांना अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्‍निकल संघटनेने केली आहे. 

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांना मोबाईलची सेवा मिळण्यासाठी सर्व कंपन्यांच्या मोबाईल टॉवर नेटवर्क सेवा देणाऱ्या कामगारांना अहोरात्र काम करावे लागत आहे. कोरोना साथीच्या काळात ही कर्मचारी काम करत आहेत. मोबाईल सेवा ही सध्याच्या काळात अत्यावश्‍यक सेवेचा भाग झालेला आहे. राज्य शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून मोबाईल नेटवर्क सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा..

नगर महापालिकेचे महिलांसाठी कोविड सेंटर

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख