कोरोना औषधांच्या चिट्ठीवर ते डाॅक्टर देतात एक टीप !कोरोनातून बरे झाल्यावर लावा एक झाड - The doctor gives a note on the prescription for corona! Plant a tree after healing from corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना औषधांच्या चिट्ठीवर ते डाॅक्टर देतात एक टीप !कोरोनातून बरे झाल्यावर लावा एक झाड

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 एप्रिल 2021

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नगर शहरात त्यांनी ओपीडी सुरू केली, मात्र मायभूमीला विसरले नाहीत. गावात त्यांची शेती आहे. शेतकरी कुटुंबात जन्मल्याने ग्रामीण भागातील प्रश्‍न त्यांना ज्ञात आहेत.

नगर : लोकं डॉक्‍टरांचे ऐकतात. आजारातून बरे होण्यासाठी पथ्य पाळतात. सध्या ऑक्‍सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळले आहे. हाच धागा पकडून वाळकी (ता. नगर) येथील डॉ. युवराज व डॉ. कोमल कासार या दाम्पत्यांनी नवा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णांना दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीवर "कोरोनातून बरे झाल्यानंतर ऑक्‍सिजनसाठी एक झाड लावा' असा संदेश ते देतात. या नवीन "औषधा'चे स्वागत होत असून, आपण झाड लावल्याचे लोक आवर्जुन सांगत आहेत. 

डॉ. कासार यांचे जन्मगाव वाळकी आहे. स्वतःच्या जन्मभूमीत वैद्यकीय सेवा द्यायची, असा त्यांचा मानस होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. वैद्यकीय शिक्षणासाठी जळगावला जावे लागले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नगर शहरात त्यांनी ओपीडी सुरू केली, मात्र मायभूमीला विसरले नाहीत. गावात त्यांची शेती आहे. शेतकरी कुटुंबात जन्मल्याने ग्रामीण भागातील प्रश्‍न त्यांना ज्ञात आहेत.

गावातील लोकांना आरोग्य सेवा देण्याचा ध्यास घेऊन त्यांनी संजीवनी हॉस्पिटल नावाने रुग्णालय सुरू केले. सध्या तेथे इतर आजारांबरोबर कोविड रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी शिबिरांच्या माध्यमातून पंचक्रोशित मोफत सेवा दिली. मोकळ्या वेळेत स्वतःच्या शेतात झाडांशी हितगुज करण्याचा त्यांचा छंद त्यांना नव्या संकल्पनेकडे घेऊन गेला. झाडे आपल्याला ऑक्‍सिजन देतात. ऑक्‍सिजन आपला प्राणवायु आहे, हे कोरोनाने चांगले निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ते रुग्णांना झाडे लावण्याचा सल्ला आवर्जुन देतात. सध्या ते प्रत्येक कोरोना रुग्णांना "कोरोनातून बरे झाल्यानंतर एक तरी झाड लावा' असे सांगतात. तसेच चिठ्ठीवर औषधाच्या खाली तसे लिहून देतात. अशी चिट्ठी ट्‌विटरवर टाकण्यात आली असून, त्याचे समाजमाध्यमातून स्वागत होत आहे. 

वेळेत उपचार हवेत 

ग्रामीण भागातील लोक आपल्या आजारांबाबत लवकर सांगत नाहीत. जास्त त्रास झाल्यानंतर डॉक्‍टरांकडे येतात. तोपर्यंत आजार वाढतो व कुटुंबातील इतरांनाही बाधा होते. चाळीस टक्के आजार घाबरल्याने बळावतो. त्यामुळे वेळेत उपचार, विलगीकरण, हॅण्डवॉश, मास्क, पोषक आहार हे पंचसुत्रे अवलंबविल्यास कोरोनाला आपण आळा घालू शकतो, असा सल्ला डॉ. कोमल कासार देतात. 

अशी सुचली संकल्पना

सध्या ऑक्‍सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागतात. झाडे ऑक्‍सिजन देतात हे केवळ पुस्तकात प्रत्येकजण शिकला; परंतु आता त्याचे महत्त्व अनुभवले. त्यामुळे चिठ्ठीवर झाडे लावण्याची संकल्पना सुचली. 
- डॉ. युवराज कासार, वाळकी 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख