जायकवाडीची तूट नगर- नाशिकच्या मानगुटीवर

गोदावरी कालव्यांचे भवितव्य अवलंबून असलेले दारणा व नाशिक शहराचे भवितव्य अवलंबून असलेले गंगापूर, ही दोन्ही प्रमुख धरणे भरली. ८० टक्के पाणीपातळी कायम ठेवून उर्वरित पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले.
Jayakwadi dam.jpg
Jayakwadi dam.jpg

शिर्डी : निम्मा पावसाळा संपला. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अवघा ३८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांच्या मानगुटीवर यंदा जायकवाडीच्या २१ टीएमसी पाणीतुटीचे भूत बसले आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तीस टक्के पाऊस अधिक झाला, ही जमेची बाजू असली, तरी नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांच्या लाभक्षेत्रात यंदा पावसाच्या प्रमाणात तब्बल ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे हे २१ टीएमसी अतिरिक्त पाण्याचा पल्ला गाठण्याचे आव्हान नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांसमोर कायम आहे.

गोदावरी कालव्यांचे भवितव्य अवलंबून असलेले दारणा व नाशिक शहराचे भवितव्य अवलंबून असलेले गंगापूर, ही दोन्ही प्रमुख धरणे भरली. ८० टक्के पाणीपातळी कायम ठेवून उर्वरित पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले. गोदावरी दुथडी भरून वाहते आहे. तथापि, दारणा व गंगापूर धरणसमूहातील एकूण पाणीसाठे लक्षात घेतले, तर अद्याप केवळ ६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. या दोन्ही धरणसमूहांतील मुकणेसारखी मोठी धरणे अद्याप निम्मी रिकामी आहेत. काही छोटी धरणे भरली असली, तरी एकूण साठवणक्षमतेत तीस टक्के कमतरता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला व पावसाचा जोर कायम, ही जमेची बाजू आहे.

भंडारदरा व निळवंडे मिळून १९ टीएमसी पाणी साठवणक्षमता आहे. आजवर १२ टीएमसी पाणीसाठा तयार झाला. आणखी सात टीएमसी पाणीसाठ्याची प्रतीक्षा आहे. मुळा धरण ४७ टक्के भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणांत पाण्याची आवक उत्तम असली, तरी जायकवाडीसाठी सोडाव्या लागणाऱ्या पाण्याचे ओझे कायम आहे.

धरणे व पाण्याची टक्केवारी

दारणा धरणसमूह- मुकणे (४८), वाकी (४०), भाम (७३), भावली व वालदेवी (१००).
गंगापूर धरणसमूह- गौतमी (५५), कश्यपी (४७).

आकडेवारीतही तफावत

जायकवाडी धरणात सध्या २९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याचे सांगितले जाते. गेल्या एक जून रोजी २७ टीएमसी पाणीसाठा होता. याचा अर्थ केवळ दोन
टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे कागदोपत्री दिसते. त्याच वेळी पाण्याची नवी आवक सहा टीएमसी झाल्याचे दर्शविण्यात येते. हे लक्षात घेतले, तर २१ टीएमसी पाण्याचे ओझे उचलताना नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांची दमछाक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com