काळरात्र टळली, वाचले प्राण ! वेळेत ऑक्‍सिजन मिळाल्याने सुटकेचा निःश्‍वास  - The dark night is over, life is saved! Exhalation of oxygen in time | Politics Marathi News - Sarkarnama

काळरात्र टळली, वाचले प्राण ! वेळेत ऑक्‍सिजन मिळाल्याने सुटकेचा निःश्‍वास 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

जिल्ह्याला सध्या चाकण एमआयडीसीतून ऑक्‍सिजन उपलब्ध झाला आहे. त्यासाठी दोन टॅंकरचे नियोजन केले असून, वाहतुकीसाठी संरक्षण देण्यात आले आहे.

नगर : केवळ तीन-चार तास पुरेल एव्हढाच ऑक्‍सिजन साठा असल्याचे खासगी रुग्णालयांनी जाहीर केले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. नेत्यांचे धाबे दणाणले. रात्री ऑक्‍सिजन मिळाला नाही, तर व्हेंटीलेटर, ऑक्‍सिजनवरील रुग्णांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला होता; परंतु नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडताच प्रशासन हबकले. राज्य पातळीवर सुत्रे हलली आणि अखेर ऑक्‍सिजनचा टॅंकर रात्री उशिरा मिळविला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. 

जिल्ह्यासाठी 29 के. एल. ऑक्‍सिजन उपलब्ध झाला. प्रारंभी जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्‍सिजन टॅंक भरविण्यात आले. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील टॅंकमध्ये भरून तो तातडीने रुग्णालयांना वितरित करण्यात आला. आनंदऋषीजी हॉस्पिटल आणि सुरभी रुग्णालयातील ऑक्‍सिजन संपला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही रुग्णालयातील रुग्णांसाठी प्राधान्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या टॅंकमधून ऑक्‍सिजन उपलब्ध करून दिला. 

शिक्रापूरला अडविले टॅंकर 

चाकण (जि. पुणे) येथील कंपनीच्या ऑक्‍सिजन प्लॅंटमधून 29 के. एल. ऑक्‍सिजन घेऊन टॅंकर नगरला रात्री नऊ वाजता रवाना झाले. एक टॅंकर हा 19 के.एल. क्षमतेचा, तर दुसरा 10 के.एल. क्षमतेचा होता. शिक्रापूरमध्ये हे टॅंकर स्थानिक नागरिकांनी रात्री साडेअकरा वाजता अडविले. पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी हा ऑक्‍सिजन ठेवा, अशी त्यांची भूमिका होती. याबाबत नगरच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा वाद मिटवित पोलिस संरक्षणात टॅंकर नगरला आणले. 

टॅंकरमध्ये बिघाड अन्‌ गॅरेजची शोधाशोध 

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे येणाऱ्या टॅंकरच्या इंजिनमधील फॅनचा बेल्ट लालटाकीजवळ तुटला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्जेपुरातील दुकानदारांना शोधून दुरुस्तीचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साहेबान जहागीरदार, वैभव ढाकणे, विपूल शेटिया यांनी विशेष परिश्रम घेऊन दुकाने उघडून बेल्ट उपलब्ध केले. त्यानंतर दीड वाजता टॅंकर रुग्णालयात दाखल झाला. 

पुढील टॅंकरला संरक्षण 

जिल्ह्याला सध्या चाकण एमआयडीसीतून ऑक्‍सिजन उपलब्ध झाला आहे. त्यासाठी दोन टॅंकरचे नियोजन केले असून, वाहतुकीसाठी संरक्षण देण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटारवाहन निरीक्षक, महसूलचे नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी, पर्यायी चालक असे सात जणांची नियुक्‍ती एका टॅंकरसाठी करण्यात आली आहे. कोणताही अपघात होऊ नये, यासाठी टॅंकरच्या पुढे पोलिसांचे एस्कार्ट सुरक्षा वाहन राहणार आहे. टॅंकरच्या मागे महसूल विभागाचे पथक राहणार आहे. 

"तळोजा'तून ऑक्‍सिजनसाठी प्रयत्न 

तळोजा (जि. ठाणे) येथे ही ऑक्‍सिजन प्लॅंट आहे. या ठिकाणावरून जवळच्या जिल्ह्याला ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातून नगर जिल्ह्याला ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पातून ऑक्‍सिजन उपलब्ध झाल्यास जिल्ह्याची ऑक्‍सिजनची गरज पूर्ण होईल. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख