राज्यासाठी दरेकर यांची दमणला धाव, भाजप 50 हजार रेमडेसिवीर देणार - Darekar's run for the state, BJP will give 50 thousand remedesivir | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

राज्यासाठी दरेकर यांची दमणला धाव, भाजप 50 हजार रेमडेसिवीर देणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

मुंबई : राज्यात रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने औषध कंपन्यांकडून हे इंजेक्शन खरेदी करून ते महाराष्ट्रातील रुग्णांना पुरविण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणच्या औषध कंपनीस भेट दिली. त्यानंतर त्यांनी पक्षातर्फे पन्नास हजार रेमेडिसीवीर इंजेक्शन राज्याला देण्याचे जाहीर केले. 

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडिसिवीरचा तुटवडा लक्षात घेता त्याची निर्यात थांबवावी, अशी विनंती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला केली होती, त्यानुसार केंद्र सरकारने तातडीने निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यावर न थांबता फडणवीस यांनी औषधे निर्यात करणाऱ्या औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा या कंपनीशी रेमेडिसीवीर इंजेक्शनबाबत चर्चा करण्यासाठी आज दरेकर व भाजप आमदारांनी दमणला धाव घेतली. 

कंपनीला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केल्यावर महाराष्ट्राला लागेल तेवढा रेमेडिसीवीर इंजेक्शनचा साठा देण्याचे आश्वासन कंपनीने दिले. तसेच देशभरात इंजेक्शनचे वितरण करण्याच्या परवानगीसाठी कंपनीने केंद्र सरकारकडेही अर्ज केल्याचे दरेकर म्हणाले.

या कंपनीला परवानगी मिळण्यासाठी व महाराष्ट्राला रेमेडिसीवीर मिळण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. एक दोन दिवसात ही परवानगी मिळाल्यावर राज्यात रेमेडिसीवीर उपलब्ध होतील, असे दरेकर यांनी सांगितले. कोरोना साथ थोपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसारच आम्ही हे प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. 

कोरोनाच्या फैलावामुळे आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्यामुळे महाराष्ट्रातील जनता भयभीत झाली आहे. राज्य सरकारने आरोप, प्रत्यारोपाचा खेळ करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यात वेळ घालवला असता तर आज ही वेळ आली नसती, असा आरोप दरेकर यांनी केला. राज्यातील जनतेप्रती असलेल्या कर्तव्यभावनेतून भाजपा कोरोना रुग्णांची मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख