नगर जिल्ह्यातील कोरोनास्थिती थेट ठाकरेंच्या दरबारी, थोरातांचे पत्र - Coronation status in Nagar district directly to Thackeray's court, Thorat's letter | Politics Marathi News - Sarkarnama

नगर जिल्ह्यातील कोरोनास्थिती थेट ठाकरेंच्या दरबारी, थोरातांचे पत्र

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

अनेक तालुक्‍यात रॅपिड अँटीजेन चाचणीचे कीट उपलब्ध नसल्यामुळे चाचण्या होत नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसत असली, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही.

संगमनेर : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच नगर जिल्ह्यातील कोवीड स्थितीबाबत नगर जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा केला आहे. या दौऱ्यात त्यांनी अनुभवलेली व स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केले आहे. 

ट्विट केलेल्या पत्रात थोरात यांनी जिल्ह्यातील वस्तूनिष्ठ अहवाल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात म्हटले आहे, की कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान 24 ते 48 तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णाचे विलगीकरण होत नाही. अनेक तालुक्‍यात रॅपिड अँटीजेन चाचणीचे कीट उपलब्ध नसल्यामुळे चाचण्या होत नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दिसत असली, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. कोरोना पॉझिटीव्ह असलेले 85 टक्के रुग्ण केवळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी आवश्‍यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांना द्यावयाची पॅरासिटेमॉल, सिट्रीझीन, झिंक, ऍझिथ्रोमायसिन, फॅबिफ्लू सारखी औषधेही शासकिय रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शने आदी देणे गरजेचे ठरते. ही औषधे उपलब्ध होण्याची कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. 

कोविडची लक्षणे दिसल्यानंतर एचआरसीटी करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याने स्कॅनिंग सेंटरवर वाढलेली गर्दी रुग्णवाढीचे कारण बनत आहे. रुग्णालयात दाखल करताना डॉक्‍टर एचआरसीटी रिपोर्टचा आग्रह धरतात. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसीटी न करणे, तसेच आवश्‍यकता नसताना ही चाचणी करायलाही न लावणे, याबाबत धोरण ठरवण्याची आवश्‍यकता आहे. अनेक डॉक्‍टर रुग्णांना गरज नसतानाही रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबत राज्यस्तरावर रेमडेसिव्हीरच्या वापराबाबत स्पष्ट निर्देश वैद्यकिय व्यावसायिकांना देणे आवश्‍यक आहे. आदी सूचना केल्या आहेत. महसूलमंत्र्यांच्या या पत्रावरुन जिल्ह्यातील कोवीडची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. 
 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख