श्रीगोंद्यात कोरोनाचे मृत्यू दडवले ? आकडेवारीत मोठी तफावत - Corona's death buried in Shrigonda? Big difference in statistics | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीगोंद्यात कोरोनाचे मृत्यू दडवले ? आकडेवारीत मोठी तफावत

संजय आ. काटे
बुधवार, 12 मे 2021

तालुक्‍यात कोरोना महामारीने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्या जशी वाढतेय, तसा मृत्यूदरही वाढल्याने, सामान्यांवर कोरोनाची दहशत वाढत आहे.

श्रीगोंदे : मागील दोन महिन्यांत तालुक्‍यात अनेकांचे बळी कोरोनाने (Corona) घेतले आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तेरा महिन्यांत कोरोनामुळे तालुक्‍यात 163 जण दगावले आहेत. दरम्यान, अनेक गावांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची प्रत्यक्ष संख्या अधिक असतानाही प्रशासनाची आकडेवारी मात्र कमी आहे. मृत्यू दडविले जात आहेत, की प्रशासनाचा हलगर्जीपणा होतोय, याची चौकशी होण्याची गरज आहे. (Corona's death buried in Shrigonda? Big difference in statistics)

तालुक्‍यात कोरोना महामारीने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्या जशी वाढतेय, तसा मृत्यूदरही वाढल्याने, सामान्यांवर कोरोनाची दहशत वाढत आहे. अर्थात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे असल्याने भीतीचे कारण नाही. तरीही कोरोनाची धास्ती मात्र कायम आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे जे मृत्यू होत आहेत, त्यांची नोंद ठेवण्याची जबाबदारी आरोग्य विभाग, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ही नोंद केवळ आरोग्य विभागच ठेवत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनेकांची नोंद मृत्यू-नोंदवहीत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. वास्तविक, कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आयसीएमआरच्या पोर्टलवर तत्काळ होणे अपेक्षित असते. तसे होत नसल्याचे वास्तव आहे. 

हेही वाचा...

राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग

तालुक्‍यातील 115पैकी 52 गावांतच कोरोनाने मृत्यू झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. त्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. या नोंदी अर्धवट आहेत. त्यांच्या माहितीनुसार, गावे व त्यातील वर्षभरातील कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या अशी ः श्रीगोंदे शहर 49, पारगाव सुद्रिक 10, आढळगाव 5, शेडगाव 7, येळपणे 5, टाकळी कडेवळीत 3, काष्टी 7, हिरडगाव 1, भानगाव 1, लिंपणगाव 2, गव्हाणेवाडी 1, कोथूळ 1, म्हातारपिंप्री 2, श्रीगोंदे कारखाना 2, बेलवंडी 4, बेलवंडी कोठार 1, बोरी 3, मांडवगण 2, मुंगूसगाव 4, चांडगाव 2, हंगेवाडी 3, चिंभळे 2, आनंदवाडी 2, बाबुर्डी 1, म्हसे 1, घारगाव 3, उक्कडगाव 2, उख्खलगाव 2, पिंपळगाव पिसे 2, मढेवडगाव 3, देऊळगाव 1, सारोळा सोमवंशी 1, वडाळी 1, वेळू 1, देवदैठण 2, टाकळी लोणार 2, घोटवी 1, निंबवी 2, वलघूड 1, लोणी व्यंकनाथ 1, ढोरजे 1, निमगाव खलू 3, कणसेवाडी 1, कोळगाव 3, कोसेगव्हाण 1, येवती 1, तांदळी दुमाला 1, खरातवाडी 1, तरडगव्हाण 1, जंगलेवाडी 2, घोगरगाव 1; एकूण 163. 

आकडेवारी तपासण्याची गरज 

श्रीगोंदे शहरातील अमरधाममध्ये गेल्या दोन महिन्यांत सुमारे 120 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची माहिती आहे. काहींचे अंत्यविधी शहराबाहेर झाले आहेत. असे असले, तरी आरोग्य विभाग तेरा महिन्यांत शहरात 49 कोरोनाबाधितांचे मृत्यू दाखवत असताना, 120 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने, नेमकी कोणती आकडेवारी खरी व कोणती खोटी, ते तपासण्याची गरज आहे. 

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची तत्काळ नोंद होणे अपेक्षित आहे. ही जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. त्यांना नगरपालिका व ग्रामपंचायतीने मदत करायची आहे. या नोंदी व प्रत्यक्षातील मृत्यू, यांच्यात तफावत असल्यास संबंधितांची चौकशी करू. 
- प्रदीपकुमार पवार, तहसीलदार, श्रीगोंदे 

 

Edited by - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख