कोरोना रुग्णासह रुग्णवाहिकाच चोरली, संगमनेरजवळील घटना - Corona stole the ambulance with the patient, incident near Sangamner | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रुग्णासह रुग्णवाहिकाच चोरली, संगमनेरजवळील घटना

आनंद गायकवाड
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सुदैवाने संगमनेर पोलिसांनी ती रुग्णवाहिका अडवून आरोपीसह घारगाव पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर रुग्णाला घेवून नातेवाईक पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

संगमनेर : गंभीर अवस्थेतील कोवीड महिला रुग्णाला पुण्याला घेवून चाललेली रुग्णवाहिका काही काळ घारगावच्या एका हॉटेलवर थांबली. लघुशंकेसाठी गेलेल्या नातेवाईक व चालकाला रुग्णासह रुग्णवाहिकाच गायब झाल्याचे समजल्याने त्यांची चांगलीच त्रेधा उडाली.

सुदैवाने संगमनेर पोलिसांनी ती रुग्णवाहिका अडवून आरोपीसह घारगाव पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर रुग्णाला घेवून नातेवाईक पुन्हा पुण्याकडे रवाना झाले. या अजब चोरीची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील घारगाव शिवारात घडली.

या बाबत अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री रुग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे (वय 65, रा. कवडदरा, नाशिक) वयाची महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना घेऊन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामागार्वरून पुण्याकडे निघाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास घारगाव येथे एका हॉटेलसमोर रुग्णवाहिका उभी करून चालक जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेला. त्यावेळी रुग्णाचे नातेवाइकही लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्व जण परत आले, त्यावेळी रुग्णवाहिका जागेवर नव्हती.

घाबरलेल्या नातेवाईकांनी तातडीने घारगाव पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या जीपीएस ट्रॅकींगवरुन ती संगमनेर येथे असल्याचे समजल्याने संगमनेर पोलिसांना माहिती दिली. त्यांनी ती ताब्यात घेतली.

घारगाव पोलिसांनी रुग्णवाहिका पळविणारा आरोपी वैभव सुभाष पांडे ( वय 30, रा. गोल्डनसिटी, गुंजाळवाडी, ता, संगमनेर) याला ताब्यात घेतले. रुग्णवाहिकेतील महिला रुग्ण सुदैवाने सुरक्षित होती. त्यांना उपचाराची गरज असल्याने पोलिसांनी ही रुग्णवाहिका तातडीने पुण्याकडे रवाना केली.

या प्रकरणी आरोपी वैभव पांडे याच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात वाहन चोरी व महिला रुग्णाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

प्राथमिक चौकशीत त्याचा जुनी वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय असून, त्याने चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे आढळून आले आहे. घारगावचे पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांच्या पथकाने तातडीने हालचाली केल्याने या अजब प्रकरणाचा शोध लागला. त्याला गुरुवार ( ता. 22 ) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख