कोरोना कमी होतोय, बाजारपेठ खुली करा : स्नेहलता कोल्हे यांचे साकडे - Corona is declining, open the market: Snehalta Kolhe's coffin | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

कोरोना कमी होतोय, बाजारपेठ खुली करा : स्नेहलता कोल्हे यांचे साकडे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

कोपरगाव : लॉकडाउनमुळे कोपरगावची बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल करून कोपरगावची संपूर्ण बाजारपेठ खुली करावी,'' अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक दिवसांपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. कोरोना व उपासमार, अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. खते, बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी शहरात येत आहेत. बाजारपेठ बंद असल्याने त्यांना शेतीसाहित्याची खरेदी करता येत नाही. 

वास्तविक, सकाळच्या वेळेत काही दुकाने उघडी असतात; परंतु त्याच कालावधीत शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू असतात. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू, तसेच शेतीपूरक साहित्याची दुकाने पूर्ण वेळ सुरू केल्यास अर्थकारणाला गती मिळेल. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी कोल्हे यांनी निवेदनात केली आहे. 

 

हेही वाचा...

वैद्यकीय अधिकाऱ्यावरील कारवाईस स्थगिती 

राहुरी : वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांच्यावरील कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना संकटात कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी केली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी कामात सुधारणा करण्याची संधी त्यांना दिली आहे. 

तहसीलदार शेख यांनी याबाबत दुजोरा देताना सांगितले, की वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक यांच्याकडे शासनाच्या राहुरी येथील बालाजी मंदिरातील ऑक्‍सिजन बेड असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोज सायंकाळी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतात. वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक मागील आठ-दहा दिवसांपासून बैठकीला गैरहजर राहिले. त्यांना वारंवार सूचना देऊनही वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. 

कोरोनाच्या संकटात शासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना एक संधी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे, असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले. 

 

हेही वाचा..

तीन वर्षांची काव्या खासदार विखे पाटलांचा फोटो काढते तेव्हा

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख