नगरमध्ये कोरोना मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 42 जणांवर अंत्यसंस्कार - Corona death ordeal in town, 42 cremated on the same day | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

नगरमध्ये कोरोना मृत्यूचे तांडव, एकाच दिवशी 42 जणांवर अंत्यसंस्कार

अमित आवारी
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

एकाच दिवशी 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे अक्षरशः जागा मिळेल तेथे सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली.

नगर : कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या 42 जणांवर काल (गुरुवारी) शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे अक्षरशः जागा मिळेल तेथे सरण रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली. 

नालेगाव अमरधाममध्ये काल (गुरुवारी) महापालिकेच्या शववाहिनीतून एकाच वेळी सहा मृतदेह एकावर एक ठेवून आणण्यात आले. गेल्या वर्षीही असाच प्रकार समोर आला होता. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 25 जणांवर 23 ऑगस्ट 2020 रोजी नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याची राज्यपातळीवर मोठी चर्चा झाली. त्यामुळे नालेगाव अमरधाममध्ये आणखी एक विद्युतदाहिनी बसविण्यात आली. त्यामुळे विद्युत दाहिन्यांची संख्या दोन झाली. तेथे दिवसाला प्रत्येकी दहा मृतदेहांचे दहन होते. एका दहनासाठी सव्वा ते दीड तास लागतो. काल (गुरुवारी) 42 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यांतील 20 अंत्यसंस्कार विद्युतदाहिन्यांत करता आले. अन्य मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ओटे कमी पडल्याने, अक्षरशः जागा मिळेल तेथे सरण रचून अग्नी देण्यात आला. 

दाखला नसल्याने अंत्यसंस्काराचा पेच 

नगरच्या स्टेशन रस्ता परिसरातील पाच जणांचे एक कुटुंब कोरोनाबाधित झाले. हे कुटुंब "होम क्वारंटाईन' झाले. त्यातील एकाचा आज मृत्यू झाला. मृत व्यक्ती कोरोनाबाधित असल्याने महापालिकेने अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी नागरिकांनी नगरसेवकांकडे केली. मात्र, कोरोनाबाधित असल्याचा दाखला असल्याशिवाय मृतावर अंत्यसंस्कार करता येणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. कोरोनाबाधित व्यक्‍तीचा घरीच मृत्यू झाल्याने डॉक्‍टरही दाखला देण्यास नकार देत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 

कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्‍यात 

अमरधाममध्ये काल 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून पीपीई किट पुरविण्यात आली नसल्याची बाब उघड झाली. पीपीई किटविनाच हे कर्मचारी अंत्यसंस्कार करीत होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख