कर्डिलेंचे आरोप बिनबुडाचे, हे राजकीय षडयंत्र, त्यांनी पुरावे द्यावेत : मंत्री तनपुरे - Cordile's allegations are baseless, this is a political conspiracy, they should give evidence: Minister Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

कर्डिलेंचे आरोप बिनबुडाचे, हे राजकीय षडयंत्र, त्यांनी पुरावे द्यावेत : मंत्री तनपुरे

विलास कुलकर्णी
रविवार, 11 एप्रिल 2021

दातीर यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांचा सोहम प्रॉपर्टीशी कोणताही वाद नव्हता. अठरा एकराचे पूर्वीचे मालक पठारे यांच्याशी त्यांचा वाद होता.

राहुरी : शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या दुर्दैवी घटना आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी या घटनेचा राजकारणासाठी वापर सुरू केला आहे. तुमच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना द्या. तपासात सहकार्य करा. पुरावे लपवू नका. तो गुन्हा आहे, असे खुले आव्हान नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले.

राहुरी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, "कर्डिले यांनी दातीर हत्या प्रकरणात माझ्यावर बेताल आरोप केले आहेत. मला बदनाम करण्याचे त्यांचे राजकीय षडयंत्र आहे. याप्रकरणी माझा दुरान्वयाने संबंध नाही. परंतु मला गोवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालविला आहे. माझे राजकारण विकासाच्या मुद्द्यावर असते. त्यांचे दुसऱ्याला नाहक अडकविण्याचे असते. त्यांनी मानसिकता बदलावी. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला. हे विसरू नये."

त्या प्रापर्टीशी संबंध नाही

"दातीर यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांचा सोहम प्रॉपर्टीशी कोणताही वाद नव्हता. अठरा एकराचे पूर्वीचे मालक पठारे यांच्याशी त्यांचा वाद होता. तोही मिटला होता. दातीर यांनी तशी नोटरी केली आहे. तनपुरे शिक्षण संस्थेच्या जमीन खरेदीचा व्यवहार १९९२ साली झाला आहे. माझे मेव्हुणे सुशीलकुमार देशमुख सोहम प्रॉपर्टीत भागीदार आहेत. त्यांनी रितसर व्यवहार करून, त्यांचा भाचा व माझा मुलगा 'सोहम' याचे नाव प्रॉपर्टीला दिले. एवढाच आमचा या प्रॉपर्टीशी संबंध आहे."

राहुरी पालिकेचे अठरा एकरवरील आरक्षण कायम आहे. मागील वर्षी पालिकेने आरक्षण विकसित करावेत असा ठराव केला आहे. आरक्षण टाकून जमिनी घ्यायच्या. नंतर आरक्षण उठवायचे. हा कर्डिलेंचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांनी विकास कामांवर राजकारण करावे. दुसऱ्याला बोगस अडकविण्याचे बंद करावे, असे तनपुरे यांनी सांगितले.

पोलीस त्यांचा तपास करतील. मुख्य आरोपी कान्हू मोरे लवकरच सापडेल. अशी खात्री आहे. त्याचे दातीर यांच्याशी काय वाद होते. याविषयी तपासात सर्व उलगडा होईल. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख