`बाळा, तुझं जितकं वय, तितकं माझं राजकारण`, असं म्हणताच मंत्री थोरातांच्या सभेत गोंधळ - Confusion in the meeting of Minister Thorat as soon as he said, "Baby, the older you are, the more my politics" | Politics Marathi News - Sarkarnama

`बाळा, तुझं जितकं वय, तितकं माझं राजकारण`, असं म्हणताच मंत्री थोरातांच्या सभेत गोंधळ

शांताराम काळे
सोमवार, 19 एप्रिल 2021

तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाहीयेत का? आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही.

अकोले : रेमडेसिव्हीर इंजेक्शन अकोले तालुक्याला का मिळत नाहीत, असा सवाल करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचा कार्यकर्ता आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर डाफरला. यावर थोरात म्हणाले, ``बाळा, तुझं जितकं वय, तितकं माझं राजकारण आहे. कुणाशी बोलतो, हे समजून घेऊन बोल,`` असे म्हणताच बैठकित गोंधळ उडाला.

अकोले येथे आज कोरोनाबाबत आढावा बैठक होती. त्यात मंत्री थोरात यांच्यासह आमदार डाॅ. किरण लहामटे तसेच अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष व रुंभोडीचे सरपंच रवींद्र मालुंजकर यांनी कोरोना आढावा बैठकीत थोरात यांच्यावरच संताप व्यक्त केला. यानंतर संतापलेल्या बाळासाहेब थोरात यांनीही मालुंजकर यांना चांगलेच सुनावले. त्यामुळे काही काळ या बैठकीत गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. 

अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचा आरोप करत मालुंजकर यांनी संताप व्यक्त केला. या वेळी त्यांनी अकोल्याला रेमडेसिवीर का मिळत नाही? असा सवाल उपस्थित केला. तसेच आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, असे म्हणत त्यांनी थोरात यांच्यावरच टीका सुरू केली.

त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “तुझं जितकं वय आहे, तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाहीयेत का? आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही.”

मी काय चुकीचं बोलतो

मालुंजकर यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर बैठकीला उपस्थित लोकांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. मात्र, `मी काय चुकीचं बोलतो आहे,` असा प्रतिसवाल करत त्यांनी आपले बोलणे सुरुच ठेवले. अकोले तालुक्याला रेमडेसिव्हीर इंजेक्शन कमी का? असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता.

आमदार लहामटे यांनी हात जोडले

दरम्यान, या गोंधळामुळे आमदार लहामटे यांनी कार्यकर्त्यापुढे हात जोडले. मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले. मात्र, त्यांनी बोलणे सुरूच ठेवले. अखेर त्यांना बैठकितून बाहेर काढण्यात आले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख