Collector.jpg
Collector.jpg

नगरचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधानांना काय सांगितले

ही आढावा बैठक नसून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हाताळणीसाठी कोणत्या चांगल्या उपाययोजना केल्या आहेत, या संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करणे, असा हेतू होता.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशातील जवळपास साठ जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. (The Collector of the town, Dr. What Rajendra Bhosale told the Prime Minister)

ही आढावा बैठक नसून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरोना हाताळणीसाठी कोणत्या चांगल्या उपाययोजना केल्या आहेत, या संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करणे, असा हेतू होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या वेळी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

वेळेची मर्यादा पाहता पाच-सहा जिल्हाधिकारी यांनी या चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील कामकाजाची माहिती नगरचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

पंतप्रधानांनी देशभरातील चांगल्या कामांबाबत सर्वांना संबोधित केले. जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणा मागील वर्षभरापासून ज्या पद्धतीने अहोरात्र काम करीत आहेत व या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, याबाबत कौतुक पूर्ण दखल घेतली.

दुसरी लाट जरी या सर्व प्रयत्नातून ओसरताना दिसत असली, तरी कोरोनाचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत कोरोनाबाबत उपाययोजना चालू ठेवाव्यात, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

आगामी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने सर्वांनी तयारी करावी व संकट जसे अभूतपूर्व आहे, तसेच आपले कामही अभूतपूर्व राहील, असा प्रयत्न सर्वजण करतील, याची खात्री असल्याचे सांगून सर्वांचे मनोबल उंचावले.
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

कोरोना प्रतिबंधासाठी नगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे अतिशय मन:पूर्वक ऐकले.

केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहिम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर/हॉस्पिटल यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.  

ऑक्सिजन उपलब्धता: जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती करणारे प्लान्ट, बाहेरुन आणण्यात येणारा ऑक्सीजन सुरक्षितरित्या पोहोचावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली. प्रत्येक ऑक्सीजन प्लान्टवर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नेमला. खासगी हाॅस्पिटलकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येऊ लागल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणी हे बर्‍यापैकी स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले.

राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. प्रतिबंधात्मक आदेश डावलून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली.

महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता महानगरपालिका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने विविध भागात मोहिम राबवून प्रतिबंधात्मक आदेशाचे भंग करणार्‍यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्‍यांसह महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक तालुक्यांचा दौरा केला. यामुळे तालुकास्तरीय यंत्रणेलाही हुरुप आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले. त्याचा अपेक्षित परिणाम दिसू लागल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या वेळी दिली.

जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणाना उद्युक्त केले. ज्या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, त्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबल बाढविले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी या वेळी  दिली. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com