जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांच्यापुढे मंगलकार्यालय चालकांची बोलती बंद ! - Collector Dr. Mangalkarya office drivers stop talking in front of Bhosale! | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांच्यापुढे मंगलकार्यालय चालकांची बोलती बंद !

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 मार्च 2021

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी लग्न समारंभासाठी फक्‍त 50 व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.

नगर : मंगल कार्यालयात लग्न समारंभ असल्यास दोनशे व्यक्‍तींना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी शहरातील मंगल कार्यालय चालकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन साकडे घातले. महसूल मंत्र्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सोपविले. त्यांनी मंगल कार्यालय चालक नियम डावलून लग्न समारंभास जादा व्यक्‍तींना उपस्थित राहण्यासाठी करत असलेल्या वेगवेगळ्या क्‍लृप्त्यांचा पाढाच वाचला. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांची बोलती बंद झाली. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी लग्न समारंभासाठी फक्‍त 50 व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. त्याच बरोबर लग्नसाठी स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. लग्न समारंभासाठी लागू केलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपये दंडाची तरतदू केली असून, पोलिस नाईक ते पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दंड वसूल करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. 

माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखालील मंगल कार्यालय चालकांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. कोरोनामुळे एक वर्षांपासून मंगल कार्यालय चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. लग्नाच्या सर्वाधिक तिथी एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच असतात. मंगल कार्यालयात लग्न सोहळा असल्यास दोनशे व्यक्‍तींना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या सर्व नियमांचे पालन करू, अशी ग्वाही दिली. 

मंत्री थोरातांनी हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रातील असल्याचे सांगितले. साथरोग नियंत्रण कायद्यानुसार जिल्ह्याच्या हद्दीत उपाययोजना आणि नियम करण्याचा अधिकार हा फक्‍त जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. तेच या निवेदनावर निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले. 

मंगल कार्यालय चालक उपस्थित व्यक्‍तींवर नियंत्रण ठेऊ शकत नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालय चालकांचा पाढा वाचताच सर्व मंगल कार्यालय चालक गप्प झाले. 

मंत्री थोरातांनी मंगल कार्यालय चालकांना समजावून सांगितले. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आणखी रुग्ण वाढले, तर लॉकडाऊन करावे लागणार आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्यास पुन्हा भेटण्यासाठी या. लग्न समारंभासाठी जादा व्यक्‍तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले. 

 

Edited By  - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख