नगर शहर लवकरच एलईडी पथदिव्यांनी चमकणार, ही आहे योजना

शहराच्या विकासासाठी पूर्वी नवनीत बार्शीकर यांनी केलेली कामे दीर्घ काळ टिकली. अशाच पद्धतीने शहराचा विकास करताना आगामी ४० वर्षांचा विचार करून, नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येत आहेत.
नगर शहर लवकरच एलईडी पथदिव्यांनी चमकणार, ही आहे योजना
sangram jagtap.jpg

नगर : शहरासह उपनगरांत सुमारे ३५ ते ४० हजार विद्युतखांब आहेत. त्यांवर एलईडी पथदिवे लावण्यासाठी निविदाप्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार आहे. या दिव्यांच्या देखभालीचे काम संबंधित संस्थाच करणार आहे. प्रत्येक पथदिव्याला क्रमांक दिला जाणार आहे. एखादा दिवा बिघडला व त्याचा क्रमांक कळविल्याबरोबर संबंधित यंत्रणा तो पथदिवा तातडीने दुरुस्त करणार आहे. त्यामुळे ही समस्या सुटणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी `सरकारनामा`शी बोलताना दिली.

शहराच्या विकासासाठी पूर्वी नवनीत बार्शीकर यांनी केलेली कामे दीर्घ काळ टिकली. अशाच पद्धतीने शहराचा विकास करताना आगामी ४० वर्षांचा विचार करून, नियोजनबद्ध पद्धतीने कामे करण्यात येत आहेत. नगर शहर पुणे-औरंगाबादच्या मध्यावर आहे. शहराची वाढ झपाट्याने होत आहे.  उपनगरे वाढत आहेत. सोबत प्रश्नही वाढतात; परंतु कामेही झपाट्याने होत आहेत. भुयारी गटार योजना, भूमिगत विद्युततारा, एलईडी पथदिवे, औद्योगिक वसाहतीतील आरक्षण, असे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. या कामांसाठी आवश्यक असणारा निधी व बैठकांना कोरोनामुळे अडचणी येत आहेत. तथापि, ही कामे मार्गी लावत शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विविध प्रश्नांवर चर्चा करताना आमदार जगताप यांनी शहराच्या विकासाचा आराखडाच मांडला. लवकरच हे शहर शेजारील जिल्ह्यांसारखे विकसित होईल, असे त्यांनी सांगितले. आमदार जगताप म्हणाले, की शहराची उपनगरे वाढत आहेत. त्यांना सुविधा देणे, वीज- पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येते. त्यासाठी शहरविकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वी देशातील २०० शहरांमध्ये नगरचे स्थान होते. तथापि, कचराकुंड्या हटविण्याची मोहीम यशस्वी झाली. शहर कचराकुंडीमुक्त झाले. महापालिकेच्या माध्यमातून घंटागाड्या आल्या. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत हे शहर देशात पहिल्या पन्नासमध्ये आले, ही महत्त्वाची बाब आहे. मुकुंदनगर, सारसनगर या भागांना सैन्यहद्द आहे. त्यामुळे विकासाला काही मर्यादा आहेत. मात्र, उर्वरित भागाचा विकास चांगला होत आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नाला मर्यादा आल्य़ परंतु इमारतींसाठी चटईक्षेत्र निर्देशांक वाढवून मिळाल्याने काहीअंशी उत्पन्नही वाढणार आहे. त्याचा फायदा मूलभूत सोयी-सुविधांसाठी होणार आहे.

रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न

जिल्ह्यातील युवक रोजगारासाठी शहरात येतात. रोजगारनिर्मितीसाठी औद्योगिक वसाहत विकसित होणे आवश्यक आहे. तेथील आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यावर भर दिला जात आहे. कोरोनामुळे बैठकांना अडचणी येतात, परंतु लवकरच हे काम मार्गी लागेल. मोठ्या कंपन्यांना जागेचाही प्रश्न भेडसावतो आहे. तो सोडविल्यावर लवकरच मोठे उद्योग नगरला येतील. त्याअंतर्गत छोट्या उद्योगांना बळ मिळेल. औद्योगिक वसाहतीला मुळा धरणाचे मुबलक पाणी मिळत आहे. शिर्डी विमानतळ झाल्याने त्याचा फायदा नगरच्या उद्योगांना होऊन, रोजगारनिर्मिती होणार आहे. आयटी पार्कसाठी यापूर्वी प्रयत्न झाले. भविष्यात या कंपन्या नगरमध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहेत.

रस्त्यांचा प्रश्न लवकरच सुटणार

अमृत पाणीयोजना व फेज-२ या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे. अमृत भुयारी गटार योजनांची कामे सुमारे पन्नास टक्के झाली आहेत. ही कामे झाल्यानंतर केंद्र सरकारकडे रस्त्यांसाठी प्रस्ताव सादर करून विशेष निधी आणला जाणार आहे. रस्ते झाल्यानंतर ते विविध योजनांसाठी खोदण्याची वेळ येणार नाही. तपोवन रस्ता, वारुळाचा मारुती रस्ता, कोठी, केडगाव देवी रस्ता, मुकुंदनगरमधील दोन रस्ते, सर्जेपुऱ्यातील रस्त्यांची कामे झाली आहेत. काटवन खंडोबा कमान ते आगरकर मळा या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, हेही काम लवकरच सुरू होणार आहे. गुलमोहर रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लागेल. शहरातील चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केट, जिल्हा रुग्णालयाचा प्रकल्प, सराफ बाजार आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

पोलिस आयुक्तालयाची मागणी

नगरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, नगरमध्ये पोलिस आयुक्तालय होणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांचे संख्याबळही वाढेल. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. पोलिसांच्या नवीन वसाहतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

पर्यटनविकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

जिल्ह्याचा पर्यटनविकास होत असताना नगर शहराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. भुईकोट किल्ल्यासाठी चार ते पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. कोरोनामुळे निधीची अडचण येत आहे. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in