दारूच्या ट्रकचा "सिनेस्टाईल' पाठलाग, अखेर पोलिसांवर वार करून चोरटे पळाले - The "cinestyle" chase of the liquor truck finally struck the police and the thieves fled | Politics Marathi News - Sarkarnama

दारूच्या ट्रकचा "सिनेस्टाईल' पाठलाग, अखेर पोलिसांवर वार करून चोरटे पळाले

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 मे 2021

चाकू, कत्ती व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून ट्रकचालकाला मारहाण करून उतरवून दिले. तीन चोरट्यांनी ट्रकचा ताबा घेतला. एका भामट्याने त्यांच्या कारमधून पलायन केले.

राहुरी : नगर-मनमाड (Nagar-Manmad Road) महामार्गावर राहुरी- कोल्हारदरम्यान काल (शुक्रवारी) मध्यरात्री एक वाजता "सिनेस्टाईल'ने 20 किलोमीटर पाठलाग करीत पोलिसांनी कोल्हारजवळ ट्रक पकडला. त्यातून तिघे उड्या मारून पळून जाताना एकावर पोलिसांनी झडप घातली. त्याने पोलिसांवर चाकूचे वार केले. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, चोरटे पसार झाले. (The "cinestyle" chase of the liquor truck finally struck the police and the thieves fled)

औरंगाबादहून शुक्रवारी (ता. 28) रात्री पुण्याच्या दिशेने एक ट्रक (एमएच 14 डीएम 0800) विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन जात होता. नगर एमआयडीसी परिसरात एका कारमधून आलेल्या चार चोरट्यांनी तो पळविला.

चाकू, कत्ती व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून ट्रकचालकाला मारहाण करून उतरवून दिले. तीन चोरट्यांनी ट्रकचा ताबा घेतला. एका भामट्याने त्यांच्या कारमधून पलायन केले. ट्रक घेऊन तिघे मनमाडच्या दिशेने भरधाव निघाले. ट्रकचालकाने तत्काळ नगर एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. 

राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मध्यरात्री सव्वा वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आठरे यांचा फोन आला. दुधाळ यांनी रात्रीच्या गस्तीपथकांना सावध केले. राहुरी येथे बालाजी मंदिराजवळ नगर-मनमाड महामार्गावर पोलिस निरीक्षक दुधाळ यांचे खासगी वाहन, पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, नीरज बोकील, कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे, लक्ष्मण बोडखे, उत्तरेश्वर मोराळे, वैभव साळवे, सचिन ताजणे यांनी दोन वाहनांसह सापळा लावला. भरधाव ट्रक दिसताच पोलिसांच्या तीनही वाहनांनी पाठलाग सुरू केला. 

कोल्हार खुर्दच्या पुलाजवळ पोलिस चालक लक्ष्मण बोडके यांनी ट्रकला ओव्हरटेक केले. पोलिसांचे वाहन आडवे आल्याचे दिसताच ट्रक थांबला. त्यातून उड्या मारून तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यांना पोलिसांनी घेरले.

एका चोरट्यावर पोलिसांनी झडप घातली. त्याने चाकूचे वार केले. पोलिस नाईक वैभव साळवे यांच्या हातावर जखम झाली. हीच संधी साधत व अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. मात्र, ट्रकसह 45 लाखांचा मुद्देमाल सहीसलामत मिळाला. 

 

हेही वाचा..

फुकट मिळेना, विकत लस घ्या

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख