राहुरीत पत्रकाराचा अपहरण करून निर्घृण खून, चाैघे संशयित ताब्यात - Chahighe suspect in abduction and brutal murder of a journalist in Rahuri | Politics Marathi News - Sarkarnama

राहुरीत पत्रकाराचा अपहरण करून निर्घृण खून, चाैघे संशयित ताब्यात

विलास कुलकर्णी
बुधवार, 7 एप्रिल 2021

पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अपहरणासाठी वापरलेली जीप कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांची असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुरी : शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजता एका साप्ताहिकाच्या पत्रकाराचा अपहरण करण्यात आले होते. रात्री पावणेअकरा वाजता राहुरी महाविद्यालय रस्त्याच्या कडेला या कार्यकर्त्याचा मृतदेह आढळून आला.

जबर मारहाण करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे समोर आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविला आहे. 
रोहिदास राधूजी दातीर (वय 48, रा. उंडे वस्ती, राहुरी) असे मृताचे नाव आहे. दातीर मंगळवारी दुचाकीवरून घरी जात असताना पांढऱ्या जीपमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. दातीर यांच्या पत्नी सविता यांनी दुपारी तीन वाजता दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अपहरणासाठी वापरलेली जीप कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांची असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपहरणानंतर दातीर व मोरे यांचे मोबाईल बंद होते.

सविता दातीर यांनी सायंकाळी पुरवणी जबाबात, "मोरे यांनी आपल्या पतीस मारहाण केली होती, तसेच कारभारी, रावसाहेब व बाळासाहेब मांगुडे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती,' असे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, रात्री पावणेअकरा वाजता दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर एका मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला. 

पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नगर येथील श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात रात्री नऊ वाजता जीप दिसून आली. 

गळा आवळून केला खून

जबर मारहाण करून, गळा आवळून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मुख्य संशयित कान्हू मोरे पसार आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी मोरेचा शोध सुरू आहे, असे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख