राज्यात भाजप सत्तेत नाही, हे श्रीगोंदेकरांचे दुर्दैव : पाचपुते

विरोधी आमदार असलो, तरी राजकीय इतिहास सगळ्यांनाच माहिती असल्याने, विकासाची कामे अडत नाहीत.
Babanrao pachpure.jpg
Babanrao pachpure.jpg

श्रीगोंदे : ‘‘तालुक्यातील जनतेच्या सोबत मी व माझ्यासोबत जनता ४१ वर्षे आहे. स्वत:वर विश्वास असून, जनतेचे कवच सोबत आहे. विरोधी आमदार असलो, तरी राजकीय इतिहास सगळ्यांनाच माहिती असल्याने, विकासाची कामे अडत नाहीत. तथापि, मतदारसंघाचा राहिलेला विकास साधण्यासाठी भाजपची राज्यात सत्ता नसणे हे तालुक्याचे मोठे दुर्दैव आहे,’’ अशी खंत आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी व्यक्त केली. (BJP is not in power in the state, this is Shrigondekar's misfortune: Pachpute)

राजकीय चर्चेतून सध्या बाजूला असलेले पाचपुते काष्टी येथे बोलताना म्हणाले, ‘‘एकट्याने लढाई जिंकण्याची सवय आहे. सामान्य लोक सोबत राहिल्याने ते शक्य झाले. त्यातच सध्याच्या काळात चर्चा जास्त झाल्यावरही अडचणी वाढतात, हेही नाकारता येत नाही. याचा अर्थ आपण संपलो, थांबलो, असा होत नाही. वेळ येऊद्या; ताकद पुन्हा एकदा दाखवून देऊ. कोण काय खेळ्या करतेय, हे बारकाईने पाहतोय. त्यामुळे भूमिका स्पष्ट करण्याची ही वेळ नाही.’’

पाचपुते म्हणाले, ‘‘आगामी निवडणुका लढणार; पण वेळ आल्यावर बोलणार आहे. नागवडे कारखान्याची निवडणूक लढणार आहोत. तरुण, नव्या चेहऱ्यांना संधी देऊ. सत्ताधाऱ्यांमध्येच दुफळी झाली. सध्या त्यांचे राजकारण सुरू आहे. त्यावरून तेथे कारभार पारदर्शी नाही, याचा अंदाज आहे.’’

श्रीगोंद्यावर ‘कुकडी’च्या पाण्यात अन्याय होतोय का, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘‘कुकडी’चा अभ्यास न करता बोलणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या वाढली आहे. ‘कुकडी’चे पाणी तालुक्यात आल्यानंतर जवळपास बारा वर्षे खालच्या लोकांच्या हक्काचे पाणी आपणच वापरले. कर्जतला काही वर्षांपूर्वी व करमाळ्यात गेल्या वर्षी ते खऱ्या अर्थी पोचले. नऊ टीएमसी पाणी श्रीगोंद्याला मिळाले पाहिजे, ते मिळत नाही. ही आत्ताची स्थिती असली, तरी यापूर्वी किती पाणी मिळाले, यावर सध्याचे पुढारी चर्चा करतात याचे वाईट वाटते. भाजपच्या काळात ‘कुकडी’ला सुधारित प्रकल्पाला मान्यता मिळताना, चार हजार कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली. बोगद्यासाठी २१८ कोटींचा निधी मंजूर झाला. पुन्हा सत्ता आली असती तर खरा विकास दिसताना श्रीगोंदेकरांना न्याय मिळाला असता. गेल्या वेळी आमदार नव्हतो तरी विकास साधला, त्याचे कारण भाजपची सत्ता होती. आपण काहीच केले नाही, अशी चर्चा करणाऱ्यांनी एकदा तालुक्याचा विकास तपासावा.’’

आपण भाजपचेच 

प्रत्येक वेळी वेगळ्या चिन्हावर विधानसभा लढण्याची आपली परंपरा आहे. यावेळी काय होईल, असे विचारता पाचपुते म्हणाले, ‘‘भविष्यातील राजकीय गणिते सांगणे अवघड आहे. कोण कुणासोबत राहील हे आत्ता सांगता येत नाही. मात्र, आपण भाजपमध्येच आहोत व नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे वेगळा विचार नाही. असे असताना, राष्ट्रवादीच्या उभारणीत वाटा असल्याने त्यांचे मंत्री आदराने वागतात. काँग्रेस नेत्यांशीही असेच संबंध आहेत. त्याचा विकासात फायदा होतो.’

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com