भयानक ! जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजनच्या न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू  - Awesome! Patient dies due to lack of oxygen in district hospital | Politics Marathi News - Sarkarnama

भयानक ! जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजनच्या न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

नगर तालुक्‍यातील एका 75 वर्षीय वृध्दाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. दोन दिवस या रुग्णावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नगर : कोरोना बाधीत रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना ऑक्‍सीजन न मिळाल्याने एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नातेवाईकांनी थेट जिल्हा प्रशासनाच्या कारभावर नाराजी व्यक्त करून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. 

नगर तालुक्‍यातील एका 75 वर्षीय वृध्दाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. दोन दिवस या रुग्णावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रविवारी पहाटे तीन वाजता रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या नातवाने ऑक्सिजन न मिळाल्याने आपल्या आजोबांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

माझ्या आजोबांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ऑक्सिजनची गरज पडली. काल रात्रीपर्यंत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरु होता. त्यांची प्रकृतीही सुधारत होती. मात्र पहाटेच्या वेळी त्यांना करण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडलेला होता. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन पुरवठा सुरु केला. परंतु तोपर्यंत ऑक्सिजन न मिळाल्याने माझ्या आजोबांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जिल्हा रुग्णालयातील कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मृत्यू पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या नातेवाईकांनी केला आहे. 

चाैकशी होणार

जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य औषधोपचार केला जात आहे. त्यामध्ये कुठलीही हायगय केली जात नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे सत्य नाही. परंतु संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या आरोपाची चौकशी करून तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी सांगितले.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख