नगरसाठीचा ऑक्‍सिजनचा टॅंकर नांदेडकडे वळविण्याचा प्रयत्न हाणून पाडला

शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यासाठी निघालेला टॅंकर तिकडे नेण्याचे नियोजन केले होते.
oxijan.jpg
oxijan.jpg

शिर्डी : ऑक्‍सिजन पुरवठ्याची शाश्‍वती न राहिल्याने साईसंस्थानने ऑक्‍सिजन बेडवर असलेले कोविड रुग्ण काल सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला, तर नगर जिल्ह्यासाठी देण्यात आलेला ऑक्‍सिजन टॅंकर नांदेडकडे जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन काल सुपे टोलनाक्‍यावरून पोलिस बंदोबस्तात नगर शहरात आणावा लागला. कोविड प्रकोप सुरू झाल्यानंतर घडलेली ही पहिलीच घटना आहे. 

शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यासाठी निघालेला टॅंकर तिकडे नेण्याचे नियोजन केले होते. मात्र नगर जिल्ह्यात देखील आणीबाणीची परिस्थिती आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हा टॅंकर सुपा टोलनाक्‍यावरून पोलिस बंदोबस्तात नगर शहरात आणला. 

साईसंस्थानकडे पन्नास ऑक्‍सिजन बेड असलेले रुग्णालय आहे. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. मात्र ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला तुटवडा भासू लागला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑक्‍सिजन बेडवरील रुग्ण सुपरस्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

या रुग्णालयात डायलेसिसचे युनिट आहे. आता कोविड रुग्ण तेथे आल्याने हे युनिट बंद करावे लागले, तर आमचे कसे होणार, या विचाराने डायलेसिसवरील रुग्ण व त्यांचे नातेवाईक आज ढसढसा रडत होते. ह्यदयविकाराने त्रस्त असलेले, हृदयशस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचार घेणारे व प्रतीक्षा यादीवर असलेले रुग्णही या निर्णयाने चिंतेत पडले. मात्र ऑक्‍सिजन पुरवठा होण्याची शाश्‍वती नसल्याने संस्थानला हा कटू निर्णय घ्यावा लागला.

सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी द्रवरूप ऑक्‍सिजनच्या प्लॅंट आहे. त्याची तूर्त तरी कमतरता नाही. त्यामुळे सत्तर ऑक्‍सिजन बेड येथे उपलब्ध करून दिले जातील. मात्र त्यामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील अन्य रुग्णांवरील उपचारांवर प्रतिकूल परिणाम होईल. 

हेही वाचा...

नगरच्या अमरधाममध्ये "वेटिंग' 

नगर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांना अमरधाममध्ये प्रतीक्षा करावी लागत आहे. आज सायंकाळी नगर शहरात पावसाने हजेरी लावल्याने अंत्यसंस्कार विधी थांबविण्यात आले.

काल दिवसभरात 42 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहरात ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. बेड मिळालाच, तर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनसाठी हातापाया पडावे लागत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी, रुग्णालयांनीच रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यास या रुग्णालयांनी केराची टोपली दाखविली. शहरातील उपलब्ध बेडपेक्षाही जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्यसुविधा वेळेवर न मिळाल्याने मृतांची संख्या वाढत आहे. 
जिल्हा रुग्णालयातून रोज 40पेक्षाही जास्त कोरोनाबाधितांचे मृतदेह नालेगावमधील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी पाठविले जात आहेत. तेथेही क्षमतेपेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचारी व विद्युतदाहिन्यांवर ताण येत आहे. शहरात बुधवारी सायंकाळी सहा वाजता पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाचे पाणी अमरधाममध्ये शिरले. त्यामुळे सायंकाळी सहानंतर अंत्यसंस्कार करता आले नाहीत. सकाळपासून 20 मृतदेहांवर विद्युतदाहिन्यांत, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत 22 मृतदेहांना इतरत्र अग्निडाग देण्यात आला. पावसामुळे या कामात व्यत्यय आल्याने मृतांचे नातेवाईक अमरधामबाहेर अंत्यविधीच्या प्रतीक्षेत उभे होते. त्यांना जड अंतःकरणाने "उद्या या' असे महापालिका कर्मचाऱ्यांना सांगावे लागले. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com