थोरातांच्या मतदारसंघात लस घेण्यापूर्वी होणार अँटिजेन चाचणी - Antigen testing will be done before vaccination in Thorat constituency | Politics Marathi News - Sarkarnama

थोरातांच्या मतदारसंघात लस घेण्यापूर्वी होणार अँटिजेन चाचणी

आनंद गायकवाड
मंगळवार, 11 मे 2021

तालुक्‍यात या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे संगमनेर लसीपूर्वी अँटिजेन तपासणी करणारा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे.

संगमनेर : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढल्याने लस घेण्यासाठी विविध वयोगटांतील नागरिकांची लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे ही केंद्रेच कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्‍वभूमीवर लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्याचे निर्देश तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत. (Antigen testing will be done before vaccination in Thorat constituency)

तालुक्‍यात या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे संगमनेर लसीपूर्वी अँटिजेन तपासणी करणारा राज्यातील पहिला तालुका ठरणार आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या या उपक्रमाचा कित्ता इतर तालुके गिरविणार आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात रौद्र रूप दाखविले आहे. बाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांत बेड मिळणेही मुश्‍कील झाले आहे. त्यातच अनेक बाधित राजरोस बाहेर फिरत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास बाधा येत आहे. सध्या लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तेथे बाधित व्यक्ती आल्यास ती "सुपर स्प्रेडर' ठरू शकते. 

हेही वाचा...

रक्षक बनला भक्षक

हा धोका लक्षात घेऊन संगमनेर येथे लसीकरण केंद्रांवर येण्यापूर्वी प्रत्येकाची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच बाधित व्यक्तीची माहिती मिळणार आहे. या बाधित व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करता येणार आहे. कोविडची लागण झालेली असतानाही गावभर फिरणारे उघड होणार आहेत. यापुढे चाचणी झाल्याशिवाय लस देण्यात येणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसांत समोर येण्याची शक्‍यता आहे. 

चाचणी करणे आवश्यक

चाचणीच्या निर्णयामुळे कोविड रुग्ण सापडण्यास व त्याच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहे. बाधित रुग्णाला लसीकरण करूनही काही उपयोग होत नसल्याने, ही चाचणी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता या चाचणीकरिता प्रशासनाला सहकार्य करावे. 
- अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख