आमदार नीलेश लंके यांचे मंत्री थोरातांसमोर अण्णा हजारेंनी केले कौतुक 

मंत्री थोरात यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे येत हजारे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची चौकशी करीत काळजी घेण्याची विनंती केली.
hajare.jpg
hajare.jpg

राळेगणसिद्धी : आमदार नीलेश लंके चांगले काम करतात. कोरोना काळात त्यांनी मागील वर्षीही आणि आताही चांगले काम केले. जनतेला धीर दिला, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आमदार लंके यांचे कौतुक केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ते आज चर्चा करीत होते. 

मंत्री थोरात यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे येत हजारे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची चौकशी करीत काळजी घेण्याची विनंती केली. 

या वेळी थोरात म्हणाले, की रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा राज्याला कमी पडू देणार नाही. सर्व कंपन्यांनी औषधांची उत्पादन क्षमता वाढविली आहे. लवकरच इंजेक्‍शन उपलब्ध होतील. राज्यात यापुढे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व ऑक्‍सिजनचा तुटवडा पडू देणार नाही. रेमडीसिवर इंजेक्‍शन तयार झाल्यानंतर पंधरा दिवसांनी ते उपचारासाठी वापरता येते. पुढील तीन चार दिवसांत पंधरा दिवसांचा कालावधी संपणार असून, राज्याला यापुढे मुबलक प्रमाणात या इंजेक्‍शनचा पुरवठा होईल. 

या वेळी आमदार निलेश लंके, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप, संभाजी रोहोकले, माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेष औटी, उद्योजक सुरेश पठारे, भालचंद्र दिवटे, शरद मापारी, दत्ता आवारी, गणेश कावरे, बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार निलेश लंके यांनी गावातील कोरोनाने निधन झालेल्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. 

हेही वाचा...

शिवभोजनासाठी संगमनेरात रांगा 

संगमनेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेली शिवभोजन थाळी संगमनेरातील अनेक वंचित व गरजूंना खऱ्या अर्थाने आधार ठरत आहे. कोविडच्या संकटात मागील वर्षी सुरू झालेली ही योजना आज किमान 200 गरिबांना एक वेळचे अन्न मोफत देत आहे. 

राज्यातील गरीब, गरजू, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी आदी घटक उपाशी राहू नयेत, या भावनेतून गेल्या वर्षी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू केला. त्याची सुरवात संगमनेरात एक जुलै 2020 रोजी झाली. मात्र, येथील शिवभोजन थाळी केंद्राने लोकसहभागाचे एक वेगळेच वैशिष्ट्य जपल्याने, एक वर्षापासून रोज दीडशे ते दोनशे गरजू लाभार्थी या केंद्रातून मोफत मिळणाऱ्या सकस व दर्जेदार अन्नाचा लाभ घेत आहेत. अनेक अन्नदाते वाढदिवसासारख्या घरगुती उपक्रमाच्या निमित्ताने दीडशे व्यक्तींच्या जेवणाचे, पाच रुपये शुल्काप्रमाणे साडेसातशे रुपये केंद्रचालकाला देऊन गोड पदार्थांसह गरजूंना अन्नदान करण्याचे समाधान मिळवत आहेत. 

शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने, महिन्यातील 22 दिवस मोफत अन्नदान होते. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, विविध स्पर्धा परीक्षा व सैनिक, पोलिस भरती केंद्रांतील युवक- युवती, शहरात महसूल व इतर कामानिमित्त आलेले शेतकरी व समाजातील इतर उपेक्षित घटक रोज या सुविधेचा लाभ घेत आहेत. वाढदिवस व इतर कार्यक्रमांवरील खर्च टाळून या शिवभोजन केंद्राला लोकसहभागातून अन्नदानाची मदत होत आहे. 

या केंद्रावरून कोणीही उपाशीपोटी परत जाऊ नये, याची काळजी पहिल्या दिवसापासून घेतली जात आहे. आजपर्यंत 40 हजार लाभार्थींनी येथील अन्नाचा आस्वाद घेतला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com