औषधविक्रेता ठरतोय देवदूत ! पैशासाठी नव्हे, तर रुग्ण वाचविण्यासाठी त्याची धडपड

श्रीगोंद्यातील एक औषधविक्रेता अभिषेक दंडनाईक याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उडी घेत सामान्यांसाठी काहीही करायची धडपड सुरू केली.
farmasisit.jpg
farmasisit.jpg

श्रीगोंदे : "दादा, माझ्या आईला कोरोना झाला आहे हो. ते रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळेल का?' दुकानात पाणावलेल्या डोळ्यांनी आलेल्या मुलाने घोगऱ्या आवाजात केलेला प्रश्‍न ऐकून "त्याचे' मन अस्वस्थ होते. समोरच्या ग्राहकाच्या खांद्यावर मायेचा हात ठेवत, "काळजी करू नकोस. आपल्या आईला आपण बरे करू,' असे सांगत, डॉक्‍टरांशी संपर्क साधून ते इंजेक्‍शन व औषधे थेट रुग्णापर्यंत पोच करताना श्रीगोंद्यातील अभिषेक राजेंद्र दंडनाईक हा औषधविक्रेता सध्या अनेकांसाठी देवदूत ठरतोय. 

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे नाव कमालीचे गाजत आहे. ते मिळत नसल्याने त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. श्रीगोंद्यातील एक औषधविक्रेता अभिषेक दंडनाईक याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उडी घेत सामान्यांसाठी काहीही करायची धडपड सुरू केली. मागील वर्षभर तो कोरोनाबाधितांना लागणारी सगळी औषधे माफक नफा घेत पुरवीत आहे. शहरासह तालुक्‍यातील अन्य औषधविक्रेतेही हेच काम करतात. मात्र, अभिषेक चर्चेत आहे तो त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे. अभिषेकने वर्षभरात कोरोना संकटात हजारो रुग्णांना इंजेक्‍शने, औषधे मिळवून दिली. 

सध्या रेमेडिसिव्हरचा तुटवडा जाणवत असला, तरी हा औषधविक्रेता रात्रीच काय; पहाटेपर्यंत दुकानात थांबून रुग्णांची सेवा करतोय. त्याने दिलेल्या औषधांचाही काळाबाजार होऊ नये, याची दक्षता घेत संबंधित रुग्ण असलेल्या रुग्णालयात औषधे पोच करतोय. रुग्णाची आर्थिक परिस्थिती नसेल, तर "अगोदर बरे व्हा. पैसे कुठे जात आहेत,' असा आधार रुग्णांच्या नातेवाइकांना देत, बिलाची मूळ रक्कम असणारी पावती हाती देऊन खांद्यावर हात ठेवत विश्वास दाखवीत आहे. ही आपुलकी त्या नातेवाइकाचे डोळे ओले करण्यास पुरेशी ठरत आहे. त्यामुळेच अभिषेक अनेकांसाठी देवदूत ठरला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

देवाचे घ्यायचे अन देवालाच द्यायचे

औषधे उपलब्ध करताना थोडा त्रास झाला; पण ती रुग्णांपर्यंत पोचल्याचे आत्मिक समाधान आहे. पैसा, प्रसिद्धी काहीही मिळवायची नाही. सध्या माणसे जगली तरी पुष्कळ आहे, अशी स्थिती असल्याने, देवाचे घ्यायचे आणि देवालाच द्यायचे; त्यातून केवळ पुण्य मिळवायचे, हीच शिकवण घरी मिळाली. तीच अंगीकारत आहे, अशी प्रतिक्रिया अभिषेक दंडनाईक यांनी व्यक्त केली.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com